पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेब आणि कारभारी खायचे आणि त्यावर पाणी पिऊन झोपी जायचे. हे काम चुकीचे आहे याची त्यांना जाणीव होती पण पोटातल्या भुकेपुढे त्यांचा नाइलाज व्हायचा. स्वत: के. बी. दादांनाही धान्याच्या तुटवड्याची जाणीव होतीच. सुट्टीच्या दिवशी आसपासच्या खेड्यांमधून मुलांनी गटागटाने फिरायचे आणि जमेल तेवढे धान्य बोर्डिंगसाठी आणायचे अशी पद्धत त्यांनी लावून दिली होती. रावसाहेबांनीही तीच पद्धत शिंदे बोर्डिंगमध्ये सुरू केली. वेगवेगळी गावे वेगवेगळ्या विद्यार्थीगटांमध्ये वाटली गेली. गावात घरोघर विद्यार्थी फिरू लागले. शिकणारी पोरे म्हणून अनेक गावकऱ्यांना त्यांच्याबद्दल सहानुभूतीही असे. गेल्यागेल्या गावकऱ्यांची एक छोटी सभाच बोलावली जाई. बोर्डिंगची गरज समजावून सांगितली जाई. रावसाहेबांना चळवळीचा अनुभव असल्याने त्यांचे बोलणे खूप प्रभावी ठरे. तसे सगळे शेतकरी गरीबच होते आणि उघड्याशेजारी नागडा गेला असाच एकूण प्रकार असे; पण तरीही हे विद्यार्थी आपल्यापेक्षाही अधिक गरजू आहेत व त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून जमलेले शेतकरी शेर, पायली, दोन पायली असे धान्य देत. यथावकाश एक-दोन पोती धान्य गोळा होई. गावातून संगमनेरला कोणाचीतरी बैलगाडी जाणारी असेच; स्वत:च पुढाकार घेऊन त्या बैलगाडीतून शेतकरी ते धान्य बोर्डिंगवर पोचते करत. मीठ, मिरची, डाळी, तेल हे पदार्थ मात्र रोखीने बाजारातून खरेदी करावे लागत. कांदे, बटाटे व वांगी सोडल्यास बाजारात भाजीपाला असा फारसा मिळायचा नाही; त्याचे दरही परवडणारे नसायचे. पण मग मुले शेतकऱ्यांच्या मळ्यांवर जात व त्यांनी स्वत:साठी लावलेला भोपळे, दोडकी, कोबी, फ्लॉवर, कारले, मेथी, करडई, घेवड्याच्या शेंगा अशाप्रकारचा भाजीपाला मिळवत. शेतकरीही बिचारे मोठ्या मनाने कधी अगदी फुकट तर कधी अगदी कमी पैसे घेऊन हा भाजीपाला बोर्डिंगसाठी देत. स्वयंपाकासाठी सरपण कुठून आणायचे हाही बोर्डिंगपुढे एक मोठाच प्रश्न असायचा. रॉकेलचा त्यावेळी खूप तुटवडा होता. रेशनच्या दुकानात ते मिळायचे पण कार्ड असेल तरच, आणि तेही अगदी थोडे. जळणासाठी लाकूड विकत घ्यायचे म्हटले तर त्याचेही दर न परवडणारे. अशा परिस्थितीत सरपणाची बेगमी करण्याचा एक वेगळाच व काहीसा धाडसी मार्ग विद्यार्थ्यांनी शोधला होता. दर दोन-तीन महिन्यांतून एका विशिष्ट रात्री विद्यार्थी लगतच्या सडकेवर जात. सडकेच्या कडेला मोठमोठी झाडे असत. लांबलांब फांद्या असलेली दोन-तीन झाडे मुलांनी पूर्वीच हेरून ठेवलेली असत. बरोबर दोन-चार कुन्हऱ्हाडी असत. रात्रीच्या अंधारात, मागून पुढून एखादे वाहन तर येत नाही ना याची खबरदारी घेत, अजुनी चालतोची वाट... ९६