पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती व शिक्षणासाठीच आपण संगमनेरला आलो आहोत, आयुष्यात पुढे यायचे असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही याची त्यांना जाणीव होती. सगळे त्यामुळे अगदी कसून अभ्यास करत. अभ्यास चालू असतानाच आळीपाळीने मुले बाहेर पटांगणात व्यायामासाठी जात व त्यानंतर लगेचच जवळच्या विहिरीवर अंघोळही उरकत. साफसफाई, पाणी भरणे, बाजार करणे इत्यादी सर्व कामे मुलेच करत असत. त्यासाठी कामाच्या पाळ्या आखलेल्या होत्या. जेवणाचे ताट- वाटी-तांब्या-भांडे ज्याचे तोच धूत असे. वाढायचे कामही मुलेच पाळी-पाळीने करत. मुख्य इमारतीला शहाबादी फरशी होती, पण समारेच्या विस्तारित पत्र्याच्या शेडखाली मातीचीच जमीन होती. ती शेणाने सारवावी लागे. शेण आणून जमीन सारवण्याचे कामही मुलेच करत असत. कामात कोणीही टंगळमंगळ करीत नसे व हे आपले घरच आहे अशा भावनेतून सगळे काम करीत. एखाद्या कुटुंबाप्रमाणेच सगळे प्रेमाने राहत. "From each according to his abilities to each according to his needs," ("प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार मिळावे याऐवजी प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार मिळावे") हे एक मार्गदर्शक तत्त्व कार्ल मार्क्सने मांडले होते व शिंदे बोर्डिंगचा कारोबार याच तत्त्वानुसार चालवला जात असे. रावसाहेब मार्क्सवादाकडे झुकायला त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती. प्रत्येक मुलाने बरोबर आणलेले धान्य एका कोठीत एकत्र जमा केले जाई व त्यातूनच रोजचा स्वैपाक होई. पण सगळेच गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने हे जमा होणारे धान्यही फार नसे. ते दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते आणि देशात धान्याचा जबरदस्त तुटवडा होता. सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने लेव्हीच्या स्वरूपात धान्य वसूल करत असे व स्वतःच्या वर्षभरातल्या वापरासाठी शेतकऱ्याकडे फारच थोडे धान्य उरे. त्यातले मुलांच्या बोर्डिंगच्या वाट्याला कितीसे येणार ? वाढत्या वयाच्या मुलांच्या भुकेला हे धान्य कधीच पुरे पडणार नव्हते. रोज पुरेसे जेवायला मिळाले नाही तर मुलांची अवस्था किती वाईट होते याचा अनुभव आदल्याच वर्षी शेतकरी बोर्डिंगमध्ये राहत असताना रावसाहेबांनी घेतला होता. खूपदा त्यांना भूक मारूनच राहावे लागे. उपाशीपोटी रात्रीची झोपही नीट लागत नसे. त्यांच्याबरोबर तिथल्या खोलीत राहणारा मित्र कारभारी कडलग खूप हरहुन्नरी होता. रात्री सर्व सामसूम झाल्यावर तो हळूच उठायचा, सैपाकघरात जायचा. स्वैपाकघराच्या दाराला बाहेरून कुलूप असायचे. मांजरीच्या पावलांनी तो वर चढायचा, स्वैपाकघरावरची दोन-चार ठरलेली कौले चलाखीने बाजूला सारायचा, हळूच खाली उतरायचा आणि स्वैपाकघरात जे काही अर्धेमुर्धे भाकरीचे तुकडे शिल्लक असतील ते खोलीत घेऊन यायचा. तेच अर्धेमुर्धे तुकडे मग शिंदे बोर्डिंग... ९५