पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थापन केली व विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची सोय केली. स्वतः रावसाहेबांचे पाडळीनंतरचे शिक्षण देवठाण, सिन्नर, नाशिक व आता संगमनेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. या सर्व ठिकाणी त्यांचे आदरातिथ्य प्रेमाने करणारे नातेवाईक होते व त्यांनी ते तसे केलेही. पण कितीही म्हटले तरी दुसऱ्या कोणाच्यातरी घरी दीर्घकाळ राहून शिक्षण घेण्यात अनेक अडचणीही होत्या. शिवाय प्रत्येक ठिकाणी असे नातेवाईक उपलब्ध असतीलच याची खात्री नव्हती - जशी परिस्थिती आता संगमनेरमध्ये रावसाहेबांवर आली होती. हा सगळा व्यक्तिगत अनुभव पाठीशी असल्यामुळेच इतर असंख्य शिक्षणार्थी युवकांच्या परिस्थितीची त्यांना चांगली कल्पना होती व म्हणूनच त्यांनी शिंदे बोर्डिंगची स्थापना केली. बोर्डिंगची सुरुवात विद्यार्थी जमवण्यापासून करणे भाग होते. कारण समाजात एखाद्या गोष्टीची कितीही गरज असली तरी ती भागवणारी एखादी यंत्रणा सुरू झाली आहे ही माहिती लोकांपर्यंत पोचणे आवश्यक असतेच. सावरगावपाट, म्हाळादेवी, मेहंदुरी, टाहाकारी, खिरविरे, कोंभाळणे, गणोरे अशा जवळपासच्या गावी ते स्वत: गेले. बोर्डिंगबद्दलची आपली कल्पना सर्वांना समजावून सांगितली. गावातील कोणकोणती मुले संगमनेरला बोर्डिंगमध्ये राहण्यासाठी येऊ शकतील त्यांची एक यादी तयार केली. जिथे स्वत: जाणे शक्य नव्हते तिथे कोणातरी मित्राला पाठवले. हा हा म्हणता ३७ मुलांची एक यादी तयार झाली. हा जूनचा पहिला आठवडा होता; त्यामुळे एक-एक करत मुले ठाकोरांच्या मळ्यात येऊन दाखलही होऊ लागली. प्रत्येकाबरोबर आपल्या सामानाची एक पेटी, निजायला वळकटी आणि पायली, दोन पायली धान्यही असायचे. सगळ्याच जातीजमातींची ती मुले होती. प्रत्येक मुलाने बोर्डिंगची फी म्हणून दरमहा काही रक्कम आणि थोडेफार धान्य आणायचे असे ठरले होते. पण ज्यांना काहीच देणे शक्य नव्हते अशांनाही प्रवेश दिलाच गेला; पैसे नाहीत म्हणून कोणालाही प्रवेश नाकारला नाही. उलट सुरुवातीला नावे दिलेल्यांपैकी अकरा जण प्रत्यक्षात का आले नाहीत याची चौकशी करण्यासाठी रावसाहेब पुन्हा एकदा त्या त्या गावी जाऊन आले. बोर्डिंगमध्ये सर्वांसाठी म्हणून एक वेळापत्रक बनवले होते व त्याचे कटाक्षाने पालन होई. पहाटे पाच वाजता उठायचे हा पहिला नियम होता. उठल्यानंतर लगेच कंदील पेटवले जात. रॉकेलवर चालणारे, वातीचे हे कंदील होते. चार-पाच मुलांमध्ये मिळून एक. शक्य तितक्या लौकर प्रातर्विधी उरकून सगळे कंदिलाच्या उजेडातच कोंडाळे करून अभ्यासाला बसत. शिक्षणाची आच असलेलीच ही मुले अजुनी चालतोची वाट... ९४