पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा एक रोचक योगायोग म्हणायचा, की या घटनेच्या बरोबर शंभर वर्षे आधी, म्हणजे नेमक्या जून १८४४मध्ये, जॉर्ज विलियम्स यांनी लंडनमध्ये Young Men's Christian Association (YMCA) ही संस्था स्थापन केली होती व तिच्या कामाचाही मुख्य भर तरुणांना राहण्यासाठी स्वच्छ आणि अतिशय माफक भाड्याने खोल्या उपलब्ध करून देण्यावर होता. त्यासाठी त्यांनी लंडन, मँचेस्टर, बर्मिंगम, शेफिल्ड, लिव्हरपूल, ऑक्सफर्ड, केंब्रिज अशा शहरांमध्ये मोठमोठी वसतिगृहे बांधली. इंग्लंडच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी वा नोकरीसाठी त्याकाळी फार मोठ्या प्रमाणावर युवक या मोठ्या शहरांमध्ये येत होते आणि मुक्कामासाठी जागा उपलब्ध नसणे ही त्यांच्यापुढची प्रमुख अडचण होती. ती दूर करणे ही मोलाची व कालसुसंगत अशी समाजसेवाच होती. साहजिकच वाय.एम.सी.ए.ला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. बघता बघता अशा वसतिगृहांचे जाळेच त्यांनी इंग्लंडमध्ये उभारले. त्यांनी पुढे आपलीच एक शाखा म्हणून Young Women's Christian Association (YWCA) सुरू केली आणि युवतींसाठीही अशी निवास व्यवस्था उभी राहिली. अमेरिकेत व अन्य युरोपातही वायएमसीएचा झपाट्याने विस्तार झाला. आज वायएमसीए ही जगातल्या सर्वोत्तम एनजीओंमध्ये गणली जाते व १२५ देशांत ती कार्यरत आहे. भारतातही मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगलोर, कोचीन, विशाखापट्टणम, पुणे वगैरे शहरांमध्ये वायएमसीएची स्वत:च्या मालकीची मोठमोठी हॉस्टेल्स आहेत व तिथे माफक दरात राहायची सोय आहे. जॉर्ज विलियम्स स्वत: धर्मनिष्ठ असल्याने राहण्याची ऐहिक गरज भागवण्यापलीकडे जाऊन निवासी युवकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठीही ते अनेक उपक्रम या हॉस्टेल्समधून आयोजित करत असत. एक नवा, सर्वार्थाने विकसित असा युवक घडवायचा हा प्रयत्न होता. ज्यांचे आईवडील शहरातच राहत होते व त्यांच्या घरी राहूनच ज्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होती त्यांना कदाचित अशा वसतिगृहांचे महत्त्व फारसे वाटणार नाही. पण छोट्या-छोट्या खेड्यांतून मोठ्या गावांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या युवकांच्या दृष्टीने अशी वसतिगृहे म्हणजे विकासासाठी अत्यावश्यक अशी शिडीच होती; कारण त्यांनी शिक्षण घ्यायचे की नाही हेच मुळी त्यांच्या निवासाची काही सोय होते की नाही यावर अवलंबून होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही जेव्हा आपल्या शिक्षण प्रसाराच्या कामाला सुरुवात केली तेव्हा गावोगावी शाळा स्थापन करण्याबरोबरच त्यांनी वसतिगृहेही शिंदे बोर्डिंग...