पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीसा बंडखोर विचार त्यांच्या मनात असावा. ही बाब पोस्टखात्याच्या लक्षात आली. लगेच त्यांना अटकही केली गेली. स्टँप अॅक्टमधील तरतुदींनुसार रावसाहेबांवर खटला दाखल केला गेला. वकील म्हणून के.बी. दादांनीच कोर्टात रावसाहेबांची बाजू लढवली. जामिनावर त्यांची लगेचच सुटका झाली आणि शिवाय वयानुसार ते सज्ञान नसल्याने Probation of Offenders Actनुसार व ज्युवेनाइल कोर्टापुढील केस होती म्हणून केवळ ताकीद देऊन त्यांना सोडून देण्यात आले. गंभीर ठरू शकले असते अशा एका संकटातून ते वाचले. रावसाहेब राजकारणातही सहभाग घेत असतात ही गोष्ट के. बी. दादांपासून लपून राहणे संगमनेरसारख्या छोट्या गावात अशक्यच होते. के. बी. दादा स्वतः सामाजिक कार्यात खूप सक्रिय होते, पण विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण होईपर्यंत राजकारणात मात्र भाग घेऊ नये अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. एक दिवस त्यांनी रावसाहेबांना व त्यांच्या चळवळीतील सहकाऱ्यांना स्वतःच्या घरी बोलावून घेतले. त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. "तुम्ही वसतिगृहात राहत असताना असल्या राजकीय हालचाली केल्या तर त्यामुळे सरकारचा रोष ओढवेल व वसतिगृह त्यामुळे अडचणीत येऊ शकेल, " ही आपली भीतीही त्यांनी व्यक्त केली. राजकीय चळवळ सोडून द्यायची रावसाहेबांची तयारी नव्हती; पण त्याचबरोबर के. बी. दादांना आपल्यामुळे अडचण यावी असेही त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे यानंतर शेतकरी बोर्डिंग सोडण्याशिवाय रावसाहेबांपुढे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी आणि भाऊसाहेब थोरात, धर्मा पोखरकर, रेवजी रंभाजी दिघे अशा काही मित्रांनी मिळून एका इमारतीत दोन खोल्या भाड्याने घेतल्या व तिथे राहण्याची व्यवस्था केली. पण जेमतेम दोन-तीन महिनेच ती व्यवस्था चालली. पाचवीची परीक्षा आटोपल्यावर ती व्यवस्था बंद पडली. त्याच सुमारास रावसाहेबांनी इंग्रजी सहावीत प्रवेश घेतला. त्याच्या थोडेच दिवस आधी त्यांचे आई-वडील (बाई-दादा) काही घरगुती वादामुळे पाडळीतले घर सोडून इथे संगमनेरला येऊन राहिले होते. संगमनेरच्या पूर्वेला गणपती मंदिराच्या जवळ ठाकोरांचा मळा म्हणून एक जागा होती. तिथे एका इमारतीत बाई दादांनी एक खोली भाड्याने घेतली. इमारतीसमोर मोकळे पटांगण होते. ठाकोरांची शेतीच होती ती. बाई-दादा कायमचे संगमनेरमध्ये स्थायिक व्हायची काहीच शक्यता नव्हती; पण ती जागा रावसाहेबांच्या मनात खूप भरली व आपण इथेच एखादे बोर्डिंग का सुरू करू नये असा विचार त्यांच्या मनात आला. दोघा-तिघांपाशी त्यांनी तो बोलून दाखवला आणि मग लगेचच त्या ठाकोरांच्या मळ्यात त्यांनी शिंदे बोर्डिंग सुरू केले. ही घटना जून १९४४ मधली. अजुनी चालतोची वाट... ९२