पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्प्रवृत्त माणसांनी एकमेकांना भेटून एकमेकांचे आत्मबळ वाढवायला हवे ही यामागची भूमिका. अंतरीच्या उमाळ्यातूनच अशा गोष्टी शक्य होतात. रावसाहेबांच्या देहबोलीतील ऋजुता, त्यांचे निरागस खळखळून हसणे, नैतिक मूल्यांचा आग्रह, त्यांची कुटुंबवत्सलता, त्यांच्यातील उपजत स्त्री सन्मान, त्यांची जातिधर्मनिरपेक्षता, स्वतःचा स्वतंत्र झेंडा न उभारता कुठल्याही चांगल्या कामाला शक्य तितकी मदत करायची धडपड असे त्यांचे अनेक स्वभावविशेष काळाच्या ओघात मनावर ठसत गेले. पण या साऱ्या व्यक्तिगत गुणांपलीकडे जाणारा विस्तृत व व्यापक सामाजिक आशयही त्यांच्या जीवनात प्रतीत होतो. रावसाहेबांचे हे चरित्र लिहायला मी प्रवृत्त झालो याचे त्यांनी आयुष्यभर धरलेला नैतिक कृतिशीलतेचा आग्रह हे एक प्रमुख कारण आहे. ते देऊ पाहत असलेल्या नैतिक सजगतेची आज कधी नव्हे एवढी गरज आहे. कारण आर्थिक समृद्धीच्या जोडीला जर आपल्याला सांस्कृतिक समृद्धीही आणायची असेल, तर त्या सांस्कृतिक समृद्धीचा महत्त्वाचा घटक असलेल्या कृतिशील नैतिकतेवर आपल्याला भर द्यावाच लागेल - जो रावसाहेब आग्रहपूर्वक देत आले आहेत. कर्तव्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत सतत फक्त हक्कांवरच लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्या समाजातील कार्यसंस्कृती पार ढेपाळली आहे आणि आपल्या एकूण अवनतीचे ते एक प्रमुख कारण आहे, अशी रावसाहेबांची धारणा आहे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपली ही भूमिका ते निर्भीडपणे मांडत असतात. 'आम आदमी वादाच्या' आजच्या युगात, सतत फक्त लोकानुनय करत राहणाऱ्या नेत्यांच्या मांदियाळीत हा स्पष्टवक्तेपणा खूप दुर्मिळ आहे. अर्थात समाजात भ्रष्टाचार कितीही बोकाळला तरी आपल्या सर्वांच्या मनात खोलवर आत कुठेतरी नैतिक शक्तीची आसही असते. रावसाहेब नेमक्या त्या नैतिक तीचे प्रतिनिधित्व करतात. रावसाहेबांचे हे चरित्र लिहावेसे वाटले याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या साठ-सत्तर वर्षांत आपल्या समाजात, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात, जे स्थित्यंतर झाले त्याचा रावसाहेब हा एक चालताबोलता, हिंडताफिरता दस्तावेज आहे. या काळात झालेले परिवर्तन सर्वस्पर्शी नाही, अजून बरेच काही बदलायला हवे आहे यात काहीच शंका नाही; पण खूप काही बदलले आहे, बदलत आहे हेही तेवढेच खरे आहे. त्यांनी लहान वयातच स्वातंत्र्यलढ्यात घेतलेला भाग, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी विद्यार्थिदशेतच काढलेले वसतिगृह, भूमिगत राहून कम्युनिस्ट चळवळीसाठी केलेले काम, एकदा भ्रमनिरास झाल्यावरही कटुवृत्तीचे वा तुच्छतावादी न बनता आदर्शाची ९