पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाहीत; 'आलोच होतो या भागात, म्हटलं तुम्हांलाही भेटून घ्यावं' असे म्हणत कोणाच्या दारात अचानक टपकण्यातला भोंगळपणा किंवा उगाचच एखाद्याच्या चांगुलपणाची सत्त्वपरीक्षा पाहणे त्यांच्यात नाही. त्याचबरोबर इतरांनीही दिलेली वेळ पाळावी अशी त्यांची अपेक्षा असते. रयतच्या एका कार्यक्रमाला एक मंत्री तब्बल दोन तास उशिरा आले आणि जराही दिलगिरी प्रदर्शित न करता काहीच विशेष घडलेले नाही अशा थाटात वावरू लागले, तेव्हा सात्त्विक संताप आलेल्या रावसाहेबांनी "तुमच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची दोन तास खोटी झाली" असे म्हणत त्यांना समज दिली. शिवाय "वेळेवर येत नाहीत अशा लोकांना केवळ ते मोठे नेते आहेत म्हणून बोलवत जाऊ नका!" असेही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सर्वांसमक्ष सांगितले. या वक्तशीरपणामागे स्वतःच्या वेळेइतकीच दुसऱ्याच्या वेळेचीही कदर आहे. वेळ ठरवून आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य मात्र ते अतिशय शालीनतेने करतील. 6 - आपल्या समाजातील ह्या शालीनतेचा अभाव त्यांना खूप खटकतो - विशेषतः मत्ताधीशांमधला व सत्ताधीशांमधला. एकदा एका पंतप्रधानांना भेटण्यासाठी पूर्वनियोजित वेळेनुसार ते दिल्लीला गेले होते. तेथील संवेदनाहीन सुरक्षाव्यवस्थेचा त्यावेळी त्यांना कटू अनुभव आला होता - त्यांच्यासोबत असलेले एक खासदार तर प्रवेशद्वारापाशी उभ्या असलेल्या उर्मट सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या धक्क्यामुळे चक्क जमिनीवर कोलमडलेच होते. खूप बड्या माणसांना भेटायला जाणे तेव्हापासून रावसाहेब शक्यतो टाळतातच. - याउलट जिथे एखादा ध्येयवादी माणूस निरलसपणे सामाजिक महत्त्वाचे काम करत असेल तिथे रावसाहेब पटकन, जणू एखाद्या आंतरिक ओढीने आकृष्ट होतात. याचा एक प्रत्यय मला अगदी अलीकडे, म्हणजे ही प्रस्तावना लिहिण्यापूर्वी जेमतेम आठ दिवस आधी आला. शेगाव येथे काही कामानिमित्त आम्ही काही जण गेलो असताना. शेगावपासून तासाभराच्या अंतरावर मलकापूर नावाचे एक छोटे गाव आहे. निवृत्ती एकनाथ पाटील नावाचे रावसाहेबांचे एक जुने स्नेही तेथे समाजप्रबोधनाचे काम करत असतात. सद्गुण संवर्धन समिती या नावाचा त्यांचा एक अनौपचारिक गट आहे. संत तुकडोजी महाराजांचे ते शिष्य. रोज सकाळी उठायचे आणि स्वच्छतेचा व नैतिक आचरणाचा प्रसार करत गावोगावी फिरायचे, हे त्यांच्या कामाचे मुख्य स्वरूप. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून आणि आर्थिक वा सत्तेच्या लाभापासून दूर राहून आयुष्यभर निवृत्तीबुवा ही समाजसेवा करत आले आहेत. "शेगावला आलोच आहे, तेव्हा आता निवृत्तीबुवांना भेटलंच पाहिजे. आता ते थकले आहेत, पुन्हा कधी भेटीचा योग येईल कोण जाणे,” असा विचार करत, स्वत:च्या तब्येतीकडे आणि खराब रस्त्याकडे दुर्लक्ष करत, चार तास खर्च करून रावसाहेब निवृत्तीबुवांना भेटून आले. अजुनी चालतोची वाट... ८