पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कास धरत राहणे, संघर्षाचा मार्ग सोडून पुढे विधायक कामाकडे वळणे, वकिलीच्या माध्यमातून त्यांनी केलेली समाजसेवा, शेती आणि दुग्धोत्पादन क्षेत्राला दिलेले योगदान, त्यांचे लेखन व वक्तृत्व, इंडियन लॉ सोसायटीसारख्या वेगवेगळ्या संस्थांसोबतचे व मुख्य म्हणजे रयतबरोबरचे त्यांचे पूर्णवेळ तीस वर्षांचे व एकूण जवळजवळ साठ वर्षांचे काम ही सारी या परिवर्तनाची प्रतिबिंबे आहेत. या साच्या परिवर्तनाची उचित अशी नोंद मराठी साहित्याच्या व वैचारिकतेच्या मुख्य प्रवाहात घेतली जाणे मला खूप आवश्यक वाटते. रावसाहेबांचा जीवनानुभव या सामाजिक स्थित्यंतरावर, परंपरेकडून नवतेकडे होत असलेल्या समाजाच्या एकूण प्रवासावर प्रकाश टाकणारा आहे; या प्रवासात इतरांनाही उपयुक्त ठरणारा आहे. - स्वत: रावसाहेबांनी गेल्या तेरा-चौदा वर्षांत नऊ पुस्तके लिहिली आहेत; हे पुस्तक लिहिताना त्यांचा आधारही मी नामोल्लेखासह घेतला आहे - विशेषत: रावसाहेबांचे विचार शक्यतो त्यांच्याच शब्दांत यायला हवेत या भूमिकेतून. आता चरित्रलेखक स्वत: तर कल्पनेने कुठल्या नव्या घटना निर्माण करू शकत नाही. असे असताना या चरित्रात आपण वेगळे असे काय लिहिणार, असा एक प्रश्न मनात निर्माण झाला होता; पण प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात केल्यावर त्याचे उत्तर झपाट्याने स्पष्ट होत गेले. एक तर पूर्वी झालेल्या लेखनात अनेक गोष्टी राहून गेल्या होत्या. उदाहरणार्थ, रावसाहेबांच्या वडलांनी पाडळी या जन्मगावी आयोजित केलेली सत्यशोधक परिषद किंवा रावसाहेबांची खरी जन्मतारीख किंवा स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांना मिळालेल्या मान्यतेतील विलंब. त्याचप्रमाणे पूर्वी केवळ नामोल्लेख झालेल्या अनेक व्यक्तींविषयी अधिक लिहिणेही आवश्यक होते. उदाहरणार्थ, नाशिकचे पुरोहितसर किंवा कर्मवीरांचा वाहनचालक उद्धव. ज्यांच्याविषयी पूर्वी लिहिले गेले होते, त्या घटनाही व्यापक आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून पाहताना मला अधिक महत्त्वपूर्ण वाटल्या. उदाहरणार्थ, रावसाहेबांनी सुरू केलेले शिंदे बोर्डिंग आणि त्याच्या बरोबर शंभर वर्षे आधी इंग्लंडमध्ये सुरू झालेली YMCA ही संस्था यांच्यातील साधर्म्य. किंवा आपल्या चुकांची कबुली द्यायची शिंदे बोर्डिंगमधील पद्धत व तिचे ख्रिश्चन चर्च वा कम्युनिस्ट कम्यून यांच्याशी असलेले सारखेपण. दुसरे म्हणजे, एखाद्या दृश्याकडे वा घटनेकडे अनेक वेगवेगळ्या कोनांमधून बघता येते आणि दृश्य वा घटना एकच असली तरी प्रत्येक कोनातून बघणाऱ्याला घडणारे दर्शन मात्र वेगवेगळे असते. त्या दर्शनात व त्या अनुषंगाने केलेल्या विश्लेषणात बघणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार फरक पडत जातो. काय घ्यायचे, किती घ्यायचे आणि काय वगळायचे याचाही निर्णय प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. चरित्रलेखनाचे यश अजुनी चालतोची वाट... १०