पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

G राहिली. रावसाहेबांनी स्पर्धेत भाग घेतला होता व आपले भाषण व्यवस्थित लिहूनही काढले होते. आंदोलनातील सहभागामुळे गोविंदराव देशपाड्यांपासून अनेक उत्तम वक्त्यांची भाषणे त्यांनी ऐकली होती. सेवादल शाखेतील सैनिकांपुढे अनेकदा भाषणे केलीही होती. पण का कोण जाणे यावेळी आपले भाषण फारसे रंगले नाही असे वाटून ते उदास झाले. निराश मनःस्थितीतच कार्यक्रम सोडून बाहेर पडले; सरळ आपल्या खोलीत जाऊन 'असं कसं झालं' याची खंत करत बसले. जरा वेळाने शाळेतला एक मित्र घाईघाईतच त्यांच्या खोलीत आला; कार्यक्रमाच्या हॉलमध्ये सगळेच त्यांना शोधत होते. "अरे, स्पर्धेत तुझा पहिला नंबर आला!" मित्राने आनंदाने बातमी दिली. रावसाहेबांचाही आनंद गगनात मावेना. सगळी उदासीनता दूर पळून गेली. आपण उगाचच स्वतःवर नाराज होतो; त्यांच्या मनात आले. सतत होकारात्मक (पॉझिटिव्ह) विचार करणे का आवश्यक आहे याची त्यांना जाणीव झाली. लोकमान्य टिळकांवरील शब्दचित्र लिहिण्याचा तो नाशिकच्या शाळेतला प्रसंग आणि वक्तृत्व स्पर्धेचा आताचा संगमनेरमधला हा प्रसंग, हे दोन्ही प्रसंग त्यांच्या मनात कायम घर करून बसले. पहिल्यातून त्यांना त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य प्रथम प्रत्ययाला आले, तर दुसऱ्यातून त्यांना त्यांच्या वाणीच्या प्रभावाचा पहिला प्रत्यय आला. आयुष्यात पुढे एक लेखक म्हणून आणि एक वक्ता म्हणून रावसाहेबांनी चांगले नाव कमावले. नगरचे पेटिट हायस्कूल एक उत्तम हायस्कूल म्हणून प्रसिद्ध होते. शिक्षकही चांगले होते, मनापासून शिकवणारे होते. त्यातलेच एक ना. के. उपासनी पुढे महाराष्ट्र राज्याच्या एस. एस. सी. बोर्डाचे चेअरमन झाले. काकतकर सर हे राज्याच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक बनले. दोघेही उत्तम शिक्षक आणि अतिशय बुद्धिमान. शाळा हेच सर्वस्व मानणारे. राहाणी साधी. पायीच येत. बाजीरावमास्तर उत्तम संस्कृत शिकवत, शिवाय घरी मोफत शिकवण्याही घेत. आपल्या घरी काही गोडधोड केले असले तर तेही विद्यार्थ्यांना आवर्जून देत. सायन्स, ॲरिथमॅटिक, जॉमेट्री व अल्जेब्रा हे चार विषय त्याकाळी शाळेत इंग्रजीतच शिकवत. शिवाय इंग्रजी हा एक स्वतंत्र विषय असायचाच. त्यामुळे ग्रामीण भागातल्याही मुलांचे इंग्रजी तसे चांगले असायचे. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात राज्य शासनाने मराठी माध्यम हे सक्तीचे केले. विज्ञान, अंकगणित, भूमिती व बीजगणित याच नावांनी हेच विषय संपूर्ण मराठीत शिकवायला सुरुवात केली. कार्बन डायऑक्साइडला कर्बवायू, ऑक्सिजनला प्राणवायू व नायट्रोजनला नत्रवायू म्हणतच ही पुढची पिढी शाळेत शिकली. पण पुढे महाविद्यालयांमध्ये हेच शिंदे बोर्डिंग... ८९