पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येतो. त्याच आम्ही सकाळ-संध्याकाळ खातो, " रावसाहेब उत्तरले. के. बी. दादांना मुलांची दया आली. ते म्हणाले, "कशाला अशा शिळ्या भाकऱ्या खाता? त्यापेक्षा आमच्या शेतकरी बोर्डिंगमध्ये जा. तिथे तुमची झोपायचीही सोय होईल आणि जेवायचीही सोय होईल." मुलांच्या फायद्याचीच ही सूचना होती व लगेचच त्यांनी आपला मुक्काम शेतकरी बोर्डिंगमध्ये हलवला. आदल्याच वर्षी के. बी. दादांनी हे बोर्डिंग सुरू केले होते. गावाबाहेर संगमनेर-अकोले रस्त्यालगत, म्हाळुगी नदीच्या कडेला. के.बी. दादा तळमळीचे समाजसुधारक होते व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. आपली मोठी मुलगी प्रभावती हिचे लग्न त्यांनी मुद्दाम आषाढ महिन्यात लावून दिले होते. चातुर्मासात विवाह करू नये या सामाजिक रूढीविरुद्ध बंड म्हणून. कुठल्याही स्वरूपात हुंडा न घेता वा देता भिकाजी जिजाबा खताळ यांच्याबरोबर हे लग्न लागले होते. हे खताळही पुढे काँग्रेसचे आमदार बनले व मंत्रीही झाले. लग्नप्रसंगी म्हणण्यासाठी 'हुंडा चाल नको, तसेच मुलीचा, पैसाही घेणे नको" असे एक खास मंगलाष्टकवजा गीत के.बी. दादांनी बसवून घेतले होते व या लग्नप्रसंगी तेच गीत गायले गेले. लग्नात जेवणाच्या पंगती नव्हत्या; फक्त बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय के. बी. दादांनी आपल्या शेतकरी बोर्डिंगमध्ये केली होती व तिथेही पिठले, चपाती, भात व चटणी हा अगदी साधा बेत होता. इतरांना मोठा उपदेश करायचा, पण स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात मात्र त्यानुसार वागायचे नाही, असा दुटप्पीपणा अनेक समाजसुधारकांच्या बाबतीत दिसतो. के. बी. दादा मात्र याला अपवाद होते; त्यांची उक्ती आणि कृती यांत अंतर नसे. सत्यशोधक चळवळीचाच एक प्रभाव म्हणून त्यांना शिक्षणाचे अपार महत्त्व पटले ते स्वत: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या खेड्यातले. शेतकरी कुटुंबातले. त्यांचे स्वतःचे उच्चशिक्षण बडोद्याला झाले होते व तिथूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादित केली होती. ग्रामीण विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेतलेच पाहिजे यावर त्यांचा भर होता व संगमनेरमध्ये वसतिगृह नाही याचा विद्यार्थ्यांना किती जाच होतो याची त्यांना कल्पना होती व म्हणूनच त्यांनी हे आठ-दहा खोल्या असलेले शेतकरी बोर्डिंग सुरू केले होते. तिथे छपराखाली रावसाहेबांना खोली मिळाली. खोलीत कारभारी कडलग आणि वाकचौरे असे इतरही दोन विद्यार्थी होते. कोल्हेवाडीला जा- ये करण्यातला त्रास वाचल्यामुळे रावसाहेबांना अभ्यासासाठीही आता अधिक वेळ मिळू लागला. त्यावेळी शाळेत झालेली एक वक्तृत्व स्पर्धा रावसाहेबांच्या कायम लक्षात अजुनी चालतोची वाट... ८८