पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चळवळीला उतरती कळा लागली त्याच सुमारास एक दुःखद घटना घडली व रावसाहेबांना नाशिक सोडणे भाग पडले. किसनमामांचा मोठा मुलगा विश्वनाथ याचे अकस्मात निधन झाले; रावसाहेबांच्या बहिणीच्या नशिबी अचानक वैधव्य आले. वैवाहिक जीवनाच्या सुखाशीही तिची ओळख झालेली नव्हती. तिच्यावर तो भयानक आघातच होता. दोन्ही कुटुंबांमधल्या नात्यालाही त्यामुळे एकदम तडा गेला. अशा परिस्थितीत रावसाहेबांना नाशिकला किसनमामांच्या घरी ठेवणे दादांना प्रशस्त वाटेना. नाशिक सोडून त्यांनी आता संगमनेरलाच पुढचे शिक्षण घ्यावे असे सर्वानुमते ठरले व रावसाहेबांनी नाशिकचा निरोप घेतला. नाशिकमधल्या त्या तीन वर्षांच्या वास्तव्याने रावसाहेबांना खूप काही दिले. तिथल्या सार्वजनिक वाचनालयातच त्यांना वाचनाची गोडी लागली. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' यांसारख्या कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितांनी तसेच 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' किंवा 'सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे' यांच्यासारख्या राष्ट्रसेवादलातील गेय आणि ओजस्वी गीतांनी इथेच त्यांच्या भावविश्वाचा कबजा घेतला. किसनमामांच्या वखारीत त्यांच्या कडक शिस्तीखाली काम करतानाच त्यांना व्यवहारज्ञानाचे धडे मिळाले. सेवादल व बेचाळीसची चळवळ यांच्यातील सहभागामुळे त्यांचा ध्येयवाद पोसला गेला तो इथेच. सानेगुरुजींसारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्यावर अमिट संस्कार झाले ते इथेच. ताडेसर आणि पुरोहितसर यांच्यासारख्या शिक्षकांनी त्यांच्या बौद्धिक प्रगतीत मोलाची भर घातली ती इथेच. पंचक्रोशीतील परिचित पाऊलखुणा सोडून मुक्त आकाशात झेपावण्याची संधी त्यांना मिळाली ती ह्या नाशिकमध्येच. म्हणूनच नाशिकविषयी रावसाहेबांच्या मनात आजही कृतज्ञता आहे. म्हणूनच ते म्हणतात, "माझ्या विचाराला आणि आचाराला अविस्मरणीय आकार मिळाला तो नाशिकमधल्या वास्तव्यात. तिथल्या आठवणी आजही मनाला भुरळ घालतात. अजुनी चालतोची वाट... ८६