पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बैठका होत राहिल्या, विशेषतः सानेगुरुजींच्या गुप्त बैठका, आणि त्यात रावसाहेब भाग घेत. पण नाशिकमध्येही आम जनतेची निदर्शने जवळजवळ थांबली होती. भूमिगत चळवळ तुरळक प्रमाणात होत राहिली. सरकारी मालमत्तेला आग लावणे, रेल्वेरूळ उखडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, प्रसंगी पोलिसांवर हल्ला करणे अशा घटना अधूनमधून होत, पण त्यांचेही प्रमाण कमी कमी होत गेले. आज मागे वळून बघताना व चळवळ का थंडावत गेली याची कारणे शोधताना रावसाहेबांना तीन कारणे महत्त्वाची वाटतात. एक कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. चळवळीला दिशा देऊ शकेल असे राष्ट्रीय पातळीवरचे जवळजवळ सगळेच नेते अगदी सुरुवातीच्या काळातच स्थानबद्ध झाले होते; स्थानिक नेतेही एकामागोमाग एक पकडले गेल्यानंतर चळवळ काहीशी पोरकीच झाली. भास्करराव दुर्वे, पी. बी. कडू पाटील, पांडुरंग भांगरे, सानेगुरुजी, मधू लिमये यांना मुंबईला मूषक महालमध्ये अटक झाली होती. नारायण अहिरे यांना सटाण्याला सेवादलाच्या शाखेत पकडले गेले. त्या भागात नेतृत्व देणारे फक्त अण्णासाहेबच उरले होते. दुसरे कारण म्हणजे प्रचंड अशा शासकीय यंत्रणेविरुद्ध दीर्घकाळ टिकाव धरणे निःशस्त्र आणि बहुतांशी असंघटित अशा क्रांतिकारकांना अशक्यच होते. देशभर नियंत्रण राखता येईल अशी सरकार नावाची एक खूप प्रभावी यंत्रणा ब्रिटिशांनी उभारली होती. गावोगावी पसरलेले पोलीस पाटील वा तलाठी हाही त्या सरकारी यंत्रणेचाच एक भाग होता. ही यंत्रणा जवळजवळ पूर्णत: ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली. यांचे खबरे खेडोपाडी होते व ते चळवळीच्या बातम्या वरिष्ठांपर्यंत पोचवत असत. आंदोलन पूर्णत: शांततामय असे नव्हतेच; त्यामुळे ते दडपायची पोलिसांना एक प्रकारे संधीच मिळायची. अशा संघटित व देशव्यापी यंत्रणेला टक्कर देणे अशक्यच होते. सरकार म्हणजे केवढी प्रचंड ताकद असलेली व गुंतागुंतीची रचना असते याची खरे तर कार्यकर्त्यांना नीटशी कल्पनाही नव्हती. आणि रावसाहेब नमूद करतात असे तिसरे कारण म्हणजे चळवळीतला एकूण समाजाचा सहभागही मर्यादितच होता. पूर्वी नाशिकचे किसनमामा पाटील तांबे वगैरेंचा उल्लेख झाला आहे. त्यांचे हितसंबंध उघडउघड शासनाबरोबर गुंतलेले होते व त्यांच्या लेखी चळवळीला फारशी किंमत नव्हती. रावसाहेब म्हणतात, "गावोगावी भूमिगत क्रांतिकारकांना जो आश्रय मिळे तो बहुधा नात्यागोत्यातील घरे किंवा स्नेहींसोबती यांच्याकडेच. खेडोपाडी आम जनतेचा स्वातंत्र्यलढ्याला व महात्मा गांधींच्या नेतृत्वाला पाठिंबा नि:संशय होता; तथापि प्रत्यक्ष कृतिशील सहभागाला मात्र लोक दडपशाहीच्या भीतीपुढे फारसे तयार नसत. ' बेचाळीसच्या आंदोलनात... ८५