पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिथे त्यांचे अवघे आयुष्यच पणाला लावले जाते, तेव्हा त्या तरुणांमध्ये एक वेगळेच मैत्र निर्माण होते. चळवळीतल्या त्या दिवसांमध्ये रावसाहेबांनाही असे अनेक जिवाभावाचे मित्र लाभले. उदाहरणार्थ, भाऊसाहेब थोरात. संगमनेरजवळच्या जोर्वे गावचे. अण्णाभाऊंचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला पण रावसाहेबांबरोबरही त्यांची घनिष्ठ मैत्री जमली. दादांची एक बहीण म्हणजे कृष्णाआत्या. दिसायला विशेष सुंदर अशी. रघुनाथ दिघे या कोल्हेवाडीच्या एका संपन्न शेतकऱ्यांशी तिचे लग्न झाले होते. त्यांची मुलगी (म्हणजे रावसाहेबांची आत्येबहीण) मथुरा ही भाऊसाहेबांची पुढे पत्नी झाली. पुढे सहकारी चळवळीत शिरल्यानंतर भाऊसाहेबांनी त्या सगळ्या परिसराचा कायापालटच केला. धर्मा पोखरकर हेही असेच एक खूप जवळीक असलेले मित्र. धर्मा वाघासारखे तडफदार होते. अत्यंत दक्ष आणि चपळ. चलाख आणि हजरजबाबी. कुठल्याही संकटात उडी घ्यायला कधीही तयार असलेले. विशेष म्हणजे क्रांतिकार्यात सामील असूनही त्यांनी आपली विनोदी वृत्ती कायम जपली होती. पहिल्या भेटीतच सानेगुरुजींना ते इतके आवडले की, "धर्मा! वा! किती छान नाव आहे!" असे म्हणत सानेगुरुजींनी त्यांच्या पाठीवरून पुन:पुन्हा हात फिरवला. योगायोग म्हणजे सानेगुरुजींच्या साहित्यामध्ये 'धर्मा' हे पात्र पुढे वरचेवर आले. दगडू गोडे, किसन पाटील, पी. बी. कडू पाटील, पांडुरंग भांगरे, नारायण आहिरे यांसारख्या इतरही अनेकांचा उल्लेख इथे करायला हवा. चळवळीतल्या सहभागामुळे या सर्वांबरोबर रावसाहेबांची घनिष्ठ मैत्री जुळली. असे आयुष्यभरासाठीचे मित्र लाभणे हा चळवळीतल्या सहभागाचा एक मोठाच व्यक्तिगत फायदा होता. राष्ट्रीय पातळीवरचे जवळजवळ सर्वच नेते चळवळीच्या अगदी पहिल्याच दिवशी डांबले गेल्यामुळे स्थानिक पातळीवर नेतृत्व देणाऱ्यांची मोठीच गरज निर्माण झाली. प्रत्यक्ष कार्यानुभवातून त्यांच्यातील नेतृत्वगुणांचाही विकास झाला. यांतल्या अनेकांनी स्वातंत्र्योत्तर काळात आपापल्या ग्रामीण परिसरात नेतृत्व द्यायचे महत्कार्य केले. स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची अशी एक फळी निर्माण करणे हाही बेचाळीसच्या आंदोलनाचा एक मोठा फायदा झाला. १९४३च्या सुरुवातीला चळवळीचा जोर हळूहळू ओसरत गेला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीचा जो आगडोंब उसळला होता त्याची तीव्रता चार-सहा महिन्यांनंतर कमी होत जाणे हे तसे स्वाभाविकच होते. चळवळीचे काम संपुष्टात आल्यानंतर रावसाहेबांच्या पाडळीच्या फेयाही खूप कमी झाल्या. नाशिकला गुप्त अजुनी चालतोची वाट... ८४