पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक परिस्थितीनुसार या महिला निरक्षरच होत्या आणि संसाराच्या रगाड्यातच अडकलेल्या होत्या. पण तरीही त्यांनी चळवळीच्या काळात उद्भवलेल्या अनेक प्रसंगांना मोठ्या धीरोदात्तपणे तोंड दिले. उदाहरणार्थ, जेव्हा पाडळी गावातल्या एका झापात भास्करराव दुर्वे चार महिने लपले होते तेव्हा त्यांना रोजची जेवणाखाण्याची रसद पोचवणे हेही मोठे धाडसाचेच काम होते; कुठल्याही क्षणी पकडले जायची भीती होतीच. कारण क्रांतिकारकांना आसरा देणे हाही गंभीरच गुन्हा होता. वेळीअवेळी पोलीस घरावर छापे घालत, झडती घेत तेव्हा घरी आसन्याला आलेल्या क्रांतिकारकांना लपवणे व येणाऱ्या संकटांना तोंड देणे हेही मोठे धाडसाचेच होते. चळवळीच्या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांचा पाडळीतील घरी सतत राबता असे. त्यावेळी त्यांना जास्तीत जास्त चांगले खायला घालण्यासाठी, त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी जनाबाई या थोरल्या सूनबाई विशेष कष्ट घेत असत आणि या कामात जिजी व ताई या त्यांच्या जावाही खूप मदत करत असत अशी रावसाहेबांची आठवण आहे. बेचाळीसच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या आवाहनाला साद देऊन स्वत:ला झोकून देणाऱ्यांत शहरांमधल्या अनेक उच्चमध्यमवर्गीय व सुशिक्षित महिला होत्या. सरोजिनी नायडू, अंबिकाबाई गोखले, मणीबेन पटेल, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुथुलक्ष्मी रेड्डी, जानकीदेवी बजाज, मृदुला साराभाई, प्रेमा कंटक, कुल्सुम सयानी, मिठीबेन पेटिट, अरुणा असफअल्ली, उषा मेहता, सुचेता कृपलानी, मृणालिनी देसाई, अनसूया लिमये अशी अनेक नावे त्या संदर्भात विचार करू लागल्यावर डोळ्यांपुढे येतात. त्यांचे योगदान महान होते याबद्दल दुमत व्हायचे काहीच कारण नाही; पण त्यांच्याच जोडीने ग्रामीण भागातील अनेक गरीब व निरक्षर महिलाही त्यांच्या त्यांच्या पातळीवर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जेव्हा स्वातंत्र्य घोषित केले आणि अधिकृत इंग्रज सरकारला समांतर असे प्रतिसरकार स्थापन केले तेव्हा तुफान दल नावाचे एक सेनापथकही त्यांनी स्थापन केले व या सेनापथकाची स्त्रीशाखाही होती. त्या शाखेविषयी बोलताना मुंबईच्या नरेपार्कवरील आपल्या एका भाषणात नाना पाटील म्हणाले होते, "आमच्या भगिनी जर आम्हांला मदत करण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या नसत्या, त्यांनी वेळेवर आम्हांला भाकरतुकडा खायला दिला नसता, जिवावर उदार होऊन आम्हांला आसरा दिला नसता, तर आम्हांला यश मिळवणे कठीण होते. " क्रांतिवीर नाना पाटील स्वातंत्र्योत्तर काळात चळवळीत सामील झालेल्यांना पुढे थोडेफार आर्थिक लाभ दिले गेले, त्यांचा उचित असा सन्मान झाला, पण महिलांची मात्र कुठेच नोंद , अजुनी चालतोची वाट... ८२