पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोखरकर यांची निर्दोष मुक्तता केली. धर्मांवर जे गुन्हे दाखल केले होते ते खूप गंभीर स्वरूपाचे होते व त्यातील एका गुन्ह्याला तर फाशीची शिक्षा होती; सरकारी खजिना तर त्यांनी लुटला होताच. पण तरीही 'संशयाचा फायदा' देऊन या गोऱ्या न्यायाधीशाने त्यांना सोडून दिले होते. बेचाळीसच्या चळवळीचा इतिहास लिहिताना अशा उदारमनस्क इंग्रज अधिकाऱ्यांचीही नोंद व्हायला हवी. अशीच विशेष नोंद निनावी राहिलेल्या पण क्रांतिकार्याला शक्य तेवढी मदत करणाऱ्या स्त्रियांचीही करायला हवी. उदाहरणार्थ, धर्मा पोखरकरांची आई. संगमनेरला एकदा धर्मा पोखरकरांच्या घरी ते स्वतः तसेच भाऊसाहेब थोरात, पांडुरंग भांगरे व भास्करराव दुर्वे हे भूमिगत कार्यकर्ते आश्रय घेऊन होते. कुठून तरी पोलिसांना सुगावा लागला. साधा वेष घालून पोलीस वस्तीच्या रोखाने येऊ लागले. धर्मांच्या आईने ओळखले, की ही पोलीस मंडळीच आहेत. ती खूप धूर्त होती. "मेल्यांनो, लपा, पोलीस येत आहेत!" असा इशारा तिने दिला व सर्व कार्यकर्त्यांना ती त्यावेळी काम करत असलेल्या शेतातील खळ्यामध्येच तिने लपवले. त्यांच्या अवतीभवती बाजरीच्या पेंढ्या उभ्या केल्या. पोलिसांनी वस्तीत सगळीकडे शोध घेतला व शेवटी "धर्मा कुठे आहे ? ताबडतोब सांग, नाहीतर याद राख !" असा त्यांनी म्हातारीला दम भरला. पण म्हातारीने त्यांना अजिबात दाद दिली नाही. "मीच शोधतेय त्याला ! मेला मोकार झालाय ! त्यालाच धरून माझ्याकडे आणा, " अशी बतावणी करून तिने पोलिसांना वाटेला लावले. पोलीस दिसेनासे झाल्यावरच तिने क्रांतिकारकांना बाहेर काढले. ती नसती, तर सगळे हमखास त्याच दिवशी पकडले जाणार होते. पुढे धर्मांना एकदा पोलिसांनी घरात घुसून अटक केली तेव्हा पोलिसांनी त्यांना मारझोड करू नये म्हणून त्यांच्या आईने "माझ्या मुलाला मारलंत तर मी विहिरीत उडी टाकून जीव देईन" अशी पोलिसांना धमकी दिली होती व त्यामुळे त्या वेळेपुरतातरी धर्मांचा मार टळला होता. धर्मा पोखरकरांची आई एक सामान्य, शेतात राबणारी, निरक्षर स्त्री होती. आपले झोपडीवजा घर व शेत सोडले तर बाहेरची कुठलीच दुनिया तिने पाहिली नव्हती. आपले घर, कुटुंब आणि शेत हेच तिचे विश्व होते. क्रांतिकारकांना शेतात लपवण्याइतकी समयसूचकता, पोलिसांसमोर बेडरपणे उभे राहण्याचे धाडस हे सारे ती कुठे शिकली? याला रावसाहेबांचे उत्तर आहे: "शेतमळ्याच्या शाळेतून आणि उघड्या दुनियेच्या विद्यापीठातून." खुद्द रावसाहेबांच्या कुटुंबातील स्त्रियांबद्दलही असेच म्हणता येईल. तत्कालीन बेचाळीसच्या आंदोलनात... ८१