पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रास्ताविक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, रयत शिक्षण संस्था या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या मानल्या गेलेल्या शिक्षणसंस्थेचे चेअरमन, पुण्यातील सुप्रसिद्ध लॉ कॉलेज चालवणाऱ्या इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्ष, नामवंत वकील आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आजच्या समाजातही नैतिक मूल्यांचा आग्रह धरणारे कृतिशील विचारवंत अशा विविध नात्यांनी आज अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे महाराष्ट्राला परिचित आहेत. प्रस्तुत लेखकाला मात्र त्यांचा प्रथम परिचय अंतर्नाद मासिकाचे एक रसिक व जाणकार वाचक म्हणून झाला. ही घटना साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची. त्याचे श्रेय सेवानिवृत्त न्यायाधीश श्री. शिवगोंडा अण्णा पाटील यांना द्यावे लागेल. ते स्वतः अंतर्नादचे वर्गणीदार होते व मासिकाचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी रावसाहेब शिंदे यांची वर्गणी भरली; ती वर्गणी पुढे रावसाहेबांनी चालूच ठेवली आणि शिवाय आपल्या मित्रवर्तुळात व शिक्षणसंस्थांत इतर काही नियतकालिकांबरोबरच अंतर्नादचा प्रसार व्हावा म्हणून ही रावसाहेबांनी बरेच प्रयत्न केले. वर्गणी पाठविताना लिहिलेल्या पत्रात व नंतरच्या संभाषणातही त्या न्यायाधीशांनी रावसाहेबांचे खूपच कौतुक केले होते. " रावसाहेब उत्तम वाचक आहेत व हे मासिक त्यांना नक्की आवडेल. श्रीरामपूर कोर्टात मी तीन वर्षं न्यायाधीश होतो. त्यावेळी माझा त्यांच्याशी जवळून संबंध आला. वकील म्हणून रावसाहेब निष्णात होतेच, पण एक माणूस म्हणूनही स्वच्छ चारित्र्याचे व निर्मळ मनाचे होते. त्यांच्या कम्युनिस्ट चळवळीतील पार्श्वभूमीमुळे गरिबांविषयी त्यांना खराखुरा कळवळा होता. अगदी कमी पैशांत वा कधीकधी विनामूल्यही ते त्यांच्या केसेस लढवत. वकिली पेशात अशी मोठ्या मनाची माणसं खूपच दुर्मिळ असतात.’ एखाद्या न्यायाधीशाने एखाद्या वकिलाबद्दल असे गौरवोद्गार काढावेत, आणि तेही त्याच्या पाठीमागे, हे विशेषच म्हणायचे. पुढे रावसाहेबांशी पत्रव्यवहार आणि गाठीभेटींतून स्नेह जुळला, वाढत गेला आणि न्यायाधीशांच्या निरीक्षणांची यथार्थता अधिकाधिक पटत गेली; रावसाहेबांचे अनेक स्वभावविशेष जाणवत गेले. उदाहरणार्थ, भेटीसाठी दिलेली वेळ ते कटाक्षाने पाळतात. 'नऊ वाजता येतो' असे ते म्हणाले असतील, तर बरोबर नऊच्या ठोक्याला दाराची घंटा वाजणारच. शिवाय पूर्वी वेळ ठरवल्याशिवाय ते कधीच कोणाला भेटायला जाणार ७