पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमिनीतून उखडला गेला आणि नेमका भाऊसाहेबांच्या पायावर पडला. पायातून असह्य कळ आली आणि जागचे हलताच येईना. बाकीच्यांनी कसाबसा तो खांब बाजूला केला, पण इकडे भाऊसाहेबांचा पाय भराभर सुजत गेला. वेदनांनी ते कळवळत होते. पण तिथे अधिक थांबणेही धोक्याचे होते कारण कुठल्याही क्षणी पोलीस यायची भीती होती. शेवटी दोघांनी आपल्या हातांची जाळी केली, त्या जाळीवर त्यांना बसवले आणि दोन फर्लांगांवर असलेल्या एका ज्वारीच्या शेतात नेऊन ठेवले. तिथून बैलगाडीने त्यांना कोल्हेवाडीला त्यांच्या आजोळी नेले. पण दुर्दैवाने पोलिसांना सुगावा लागला आणि कोल्हेवाडीलाच भाऊसाहेबांना अटक झाली. अण्णासाहेबांप्रमाणे त्यांनाही नासिक रोड जेलमध्ये डांबण्यात आले. पकडले जायची आता पाळी आली होती धर्मा पोखरकर यांची आणि तो प्रसंगही लौकरच आला. शेतसारा म्हणून, तसेच तगाई वगैरे स्वरूपात जी रक्कम सरकारी खजिन्यात भरली जायची तिला भरणा म्हणत. कापडी थैलीत ही रक्कम ठेवलेली असे. सोबत हिशेबाच्या तपशिलाचे कागदही असत. येसकर अथवा जागल्याजवळ ही थैली दिली जायची आणि तालुक्याला खजिन्यात भरण्यासाठी ती मामलेदाराकडे पोचती व्हायची. समशेरपूरहून जाणाऱ्या अशा भरण्याची माहिती सावरगावपाटचे किसन पाटील यांनी क्रांतिकारकांना दिली. हा भरणा लुटण्याचे काम धर्मा पोखरकर आणि नारायण अहिरे यांनी स्वीकारले. किसन पाटील स्वतः गावचे पाटील होते; म्हणजे सरकारी यंत्रणेचाच एक घटक होते. पण तरीही क्रांतिकार्यात सहभागी होऊन त्यांनीच हा कट रचला होता. भरणा लुटताना कोणी दगाफटका करू नये म्हणून आपल्या विश्वासातले दोन भिल्लही त्यांनी पोखरकर आणि अहिरे यांच्या सोबत दिले. भरणा लुटण्याच्या दृष्टीने अगदी सुरक्षित अशी डोंगरातली एक जागाही त्यांनीच दाखवली. एका वळणावर त्या डोंगरातलाच एक भलामोठा दगड होता. फडक्याने आपापली तोंडे पूर्ण झाकून त्या दगडाआड दोघे लपून राहिले. वळणावर येसकर येताच दोघे पुढे झाले व हातातले भाले येसकरांवर रोखून "भरणा फेक दो" असा त्यांनी हुकूम सोडला. घाबरलेला येसकर थैली तिथेच टाकून जीव मुठीत धरून पळून गेला. धर्मा व नारायण ती थैली उचलून आडवाटेने सुसाट पळाले. ठरल्याप्रमाणे राजापूरला एका क्रांतिकारकांच्या अड्ड्यावर त्यांनी ती थैली पोचवली. दुसऱ्या दिवशी भरणालुटीची ही बातमी सर्वांना कळली. सरकारी खजिना लुटणे हा खूप गंभीर गुन्हा होता. धर्मांवर पोलिसांचा संशय होताच. काही दिवसांनी पोलिसांनी त्यांना पकडलेच. पोलीस कोठडीत त्यांचा अनन्वित छळ केला गेला. बुक्के, बुटांच्या लाथा, काठ्या यांचा वर्षाव व्हायचा. सगळे अंग बेचाळीसच्या आंदोलनात...