पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या घरी आले आणि सर्वांना अधिक सावधगिरीच्या सूचना देऊन गेले. आपण केव्हा ना केव्हा पोलिसांच्या हाती लागणार याविषयी त्यांची खात्री होती पण होता होईतो आपले काम नेटाने करत राहायचा त्यांचा निर्धार होता. पट्टा किल्ला परिसरातच आता अण्णाभाऊंचा बराचसा वावर असे. तो जंगलांनी व्यापलेला भाग असल्याने त्यांच्यासारख्या भूमिगत कार्यकर्त्यांना तुलनेने तो अधिक सुरक्षित वाटे. पायथ्याशी वैतागवाडी एकच गाव होते. तिथे जायला कच्ची सडकदेखील नव्हती. जाणे-येणे खूप अवघड असल्यामुळेच कदाचित त्या गावाला वैतागवाडी म्हणत असतील. तो सगळा आदिवासी मुलुख होता व दगडू गोडे हे तेथील आदिवासींमधील बडे प्रस्थ होते. क्रांतिकार्याशी ते पूर्ण एकरूप झाले होते. अण्णाभाऊंवर त्यांचा फार जीव. त्यांच्या साहाय्याने अण्णाभाऊंनी पट्टा किल्ल्यावर एके दिवशी सकाळी तिरंगा झेंडा फडकवला, झेंडावंदन केले व स्वराज्याची घोषणा केली. दुर्दैवाने झेंडावंदन झाल्यावर ते एकाएकी तापाने फणफणले; अर्धवट बेशुद्धीतच गेले. दगडू गोडे यांनी इतर आदिवासींच्या मदतीने त्यांना घोंगडीच्या डोलीत घालून पट्टा किल्ल्यावरून खाली आणले, वैतागवाडीला स्वत:च्या घरी नेले व तेथून बैलगाडीत घालून संगमनेरला डॉ. बी. जी. गाडगीळ यांच्या दवाखान्यात नेले. हा सर्व प्रवास खूप लपूनछपून करणे भाग होते. कारण अण्णाभाऊ तेव्हा भूमिगत होते व पोलीस त्यांच्या मागावर होते. संगमनेरमध्ये सर्वोत्तम मानले जाणारे डॉ. गाडगीळ स्वतः देशभक्त होते व मोठा धोका पत्करूनही ते क्रांतिकारकांवर औषधोपचार करत असत. अण्णाभाऊंना न्युमोनिया झाल्याचे तपासणीत उघड झाले. या आजारपणात त्यांची फुफ्फुसे कमजोर झाली आणि पुढे आयुष्यभर त्यांना फुफ्फुसांचा त्रास होत राहिला. डॉ. गाडगीळांकडचे उपचार चालू असतानाच कुठूनतरी पोलिसांना सुगावा लागला व दोन-तीन वसांतच ोलिसांनी दवाखान्यातच अण्णाभाऊंना अटक केली. क्रांतिकार्याचा एक भाग टेलिफोनच्या तारा व खांब तोडणे हा होता. भाऊसाहेब थोरात, धर्मा पोखरकर, पांडुरंग भांगरे वगैरेंचा एक गट त्या कामात खूप वाकबगार बनला होता. तारा तोडण्याचे एक विशिष्ट तंत्र त्यांनी विकसित केले होते. दोराच्या आणि पकडीच्या साह्याने ते चार-पाच जणच एका रात्रीत इतक्या तारा तोडत आणि टेलिफोनचे इतके खांब उखडत, की पोलिसांना वाटायचे निदान पंचवीस-तीस जणांची टोळी या कामामागे असावी. १९४३च्या जानेवारी महिन्यातली घटना. अहमदनगर- कोल्हार रस्त्यावरून आपले तारा तोडण्याचे आणि खांब मोडण्याचे काम करत हा गट चालला होता. त्या प्रयत्नात एक खांब अजुनी चालतोची वाट... ७८