पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एवढे सगळे होऊनही दादांनी कार्यकर्त्यांना शक्य ती सर्व मदत करताना कधीही मागेपुढे पाहिले नाही किंवा आपल्या मुलांना क्रांतिकार्यात सहभागी होण्यापासून कधी परावृत्तही केले नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच होता. पोलीस ज्यांच्या मागावर होते अशा त्या परिसरातील भूमिगतांच्या यादीत अण्णाभाऊंचे नाव सर्वांत पहिले होते. ते इथेच कुठेतरी लपले आहेत याविषयी पोलिसांची खात्री होती व त्यांना हुडकून काढण्यासाठी पोलिसांची एक स्वतंत्र तुकडीच तो सगळा परिसर पालथा घालत होती. पण पोलिसांना अण्णाभाऊ सापडत नव्हते. शेवटी तपासाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेऊन टॉमकिन नावाचा एक गोरा प्रांत अधिकारी स्वतःच ठाणगाव-पाडळीला आला. संपूर्ण नाशिक विभाग टॉमकिनच्या आधिपत्याखाली होता. त्या काळी प्रांताधिकाऱ्याचा जबरदस्त दरारा असे. मुख्यालय सोडून तो फिरतीवर निघाला की संपूर्ण मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त असे. महसूल व पोलीस खात्याचे अधिकारी खूप द राहत. तो घोड्यावर स्वार होऊन किंवा घोड्याच्या बग्गीत बसून निघाला की रस्त्यावरची संपूर्ण रहदारी थांबवण्यात येई. मोकळ्या शिवारात त्याने आपला कँप थाटला आणि चौकशीची जोरदार मोहीम सुरू केली. आजूबाजूचे जवळजवळ सर्वच अधिकारी ठाणगावात डेरेदाखल झाले. प्रांताधिका-याबरोबर बटलर, कुक असा त्याचा स्वत:चा मोठा लवाजमाही होता. आसपासच्या सर्व गावांतील पाटील, तलाठी, जागले व येसकर यांना बोलावून घेतले गेले. लोकांचा मोठा राबता ठाणगावमध्ये सुरू झाला. गावकऱ्यांच्या दृष्टीने ही एक अभूतपूर्व अशीच घटना होती. सगळीकडे प्रचंड घबराट पसरली. टॉमकिनने पाडळीतल्या प्रमुख गावकऱ्यांना कँपमध्ये बोलावले. त्यांत पाटीलभाऊही होते. त्यांच्यावर पिस्तूल रोखून टॉमकिनने त्यांना "तुझा भाऊ अण्णासाहेब कुठे आहे ?” असे आपल्या मोडक्यातोडक्या मराठीत दरडावून विचारले. पण पाटीलभाऊ जरासुद्धा बधले नाहीत. "मला माहीत नाही" असे त्यांनी बेधडक उत्तर दिले. टॉमकिन भयंकर चिडला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने पिस्तुलातून गोळी झाडली. पण पाटीलभाऊ चपळाईने बाजूला सरकले. शेजारीच उभ्या असलेल्या बाळाजी गुंड नावाच्या ठाणगावच्या एका रहिवाश्याला हातावर गोळी लागली. हा बाळाजीही तसा क्रांतिकार्यात सामील होता, पण तो भूमिगत नव्हता. त्याच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. त्याला लगेच सिन्नरला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. सगळीकडे एकच घबराट उडाली आणि मग त्या गदारोळात पुढील चौकशी तात्पुरतीतरी टळली. अण्णाभाऊंच्या कानावर ही बातमी गेल्यावर ते एकदा गुपचूप पाडळीतल्या बेचाळीसच्या आंदोलनात... ७७