पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरकारी कचेया ताब्यात घेऊन तिथे तिरंगा फडकवणे याचप्रमाणे पुलासारखी दळणवळणाची सरकारी साधणे तोडणे हादेखील चळवळीचा एक भाग होता. नाशिक - सिन्नरहून अकोल्याला जाणारा रस्ता पाडळी गावाजवळून जायचा. गावापासून पाच-सहा मैल अंतरावर हा रस्ता एका खिंडीतून जात असे. दोन्ही बाजूंनी डोंगरांच्या उंच रांगा होत्या. जवळच एक देवस्थान होते, म्हणून या खिंडीला देवीची खिंड म्हणत. ह्या खिंडीतला रस्ता ओढ्यावरील एका पुलावरून जात असे. हा पूल तोडला तर तो सगळाच रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार होता. त्यामुळे तो पूल तोडावा असा निरोप अण्णाभाऊंच्या मार्फत पाटीलभाऊ यांच्याकडे आला. रावसाहेबही त्यावेळी पाडळीतच होते. दोघा भावांनी पाडळीतले २०- २५ दणकट तरुण गोळा केले आणि हातात पहारी, टिकाव, कुदळी अशी हत्यारे घेऊन मध्यरात्रीच्या काळोखात सगळे पुलापाशी पोचले. पुलाच्या बांधकामावर सगळे वाघाप्रमाणे तुटून पडले. रात्रीच्या वेळी त्या काळी रस्त्यावर चिटपाखरूही नसायचे. पहाटेपर्यंत पूल तोडला गेला, पुलाची मोरीही पूर्णपणे पाडण्यात आली. सगळ्या मोहिमेचे नेतृत्व पाटीलभाऊंनी केले होते. त्यांचा आवाज करारी होता, वृत्ती धाडसी होती व एकूण देहबोलीच इतरांना जरब वाटावी अशी होती. त्यामुळे त्यांची आज्ञा सगळे लगेच पाळायचे. काही जणांमध्ये जन्मतःच काही नेतृत्वगुण असतात; पाटीलभाऊ त्यांतलेच एक होते. काम फत्ते करून सगळे पहाटे आपापल्या घरी परतले. दुसऱ्या दिवशी हा पूल तोडला असल्याची बातमी गावोगावी पसरली. परिसरातल्या इतरही कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील छोटे-मोठे पूल पाडल्याची बातमी होती. सगळीकडे एकच बोंबाबोंब उसळली. पोलिसांची धावपळ सुरू झाली. आंदोलनाची गंभीर दखल घेणे सरकारला भाग पडले. नाहीतरी आंदोलकांचा उद्देश तोच होता. पोलिसांनी घरोघर झडत्यांचे सत्र सुरू केले. संशयितांना पकडून मारहाण केली जाऊ लागली. पाडळी, वैतागवाडी, सावरगावपाट, नवलेवाडी, वाशेरे, राजापूर ह्या सगळ्या भागात आंदोलकांचा छुपा वावर होता. पाडळीतले दादांचे घर हे आंदोलकांचे मुख्य आश्रयस्थान आहे अशी कुणकुण पोलिसांच्या कानावर गेली होती. त्या घरावर वरचेवर पोलिसांचे छापे पडत होते. दादा गावचे पोलीस पाटील होते. त्यांची पाटीलकी सरकारने रद्द केली. त्यांची बंदूक, काडतुसे जप्त करण्यात आली. कर्जबाजारी तर ते झालेच होते, जमीन गहाण पडली होती, त्यामुळे तशी त्यांची पूर्वीच नाचक्की झाली होती; आता पाटीलकी व बंदूक गेल्यामुळे आणि सतत पडणाऱ्या पोलिसांच्या धाडींमुळे त्या नामुष्कीत अधिकच भर पडली. पण अजुनी चालतोची वाट... ७६