पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाट पाहत. भूमिगत कार्यकर्त्यांना तर या वार्तापत्रांचे महत्त्व खूपच होते. ही महत्त्वाची जबाबदारी भास्करराव पार पाडत. या वार्तापत्राचे वितरण हेपण खूप जिकिरीचे काम होते. कारण पोलिसांची नजर चुकवूनच ते करावे लागे. दर शनिवारी - रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी रावसाहेब पाडळीला जात व वार्तापत्राचे गठ्ठे भाजीच्या टोपलीत वगैरे लपवून नाशिकला घेऊन येत. शाळेच्या इतर काही विद्यार्थ्यांमार्फत व राष्ट्रसेवादलाच्या कार्यकर्त्यांमार्फत शहरभर व खेडोपाडीही या प्रती वितरित होत. या कामातला रावसाहेबांचा आत्मविश्वास खूपच वाढला होता. पोलिसांचा डोळा चुकवून बेमालूमपणे हे काम करण्यात आता ते व त्यांचे मित्र चांगलेच तरबेज झाले होते. स्वातंत्र्य आंदोलनाचा कार्यक्रम भास्कररावांनी सुस्पष्टपणे समजावून दिला होता: 'ब्रिटिश सरकारबरोबर पूर्ण असहकार पुकारायचा. सारा कोणीही भरायचा नाही. युद्धनिधी द्यायचा नाही. लष्करात भरती व्हायचे नाही. सक्तीच्या धान्य लेव्हीला विरोध करायचा. सरकारी अधिकाऱ्यांना गावात येण्यास मज्जाव करायचा. सरकारबरोबर सहकार्य करणाऱ्यांवर बहिष्कार टाकायचा. गावातले तंटेबखेडे गावातच मिटवायचे. न्यायनिवाडा गावातच करायचा. गावचा कारभार गावकऱ्यांनीच करायचा. यापुढे कचेरीत जायचे नाही. सर्व ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करायचे व त्याच्या आदेशानुसार कारभार चालवायचा. ' क्रांतिसिंह नाना पाटील यांची साताऱ्यातील प्रतिसरकारची चळवळ त्यावेळी जोरात होती व तेथील बातम्या इथूनतिथून कार्यकर्त्यांच्या कानावर येत असत. त्यापासून प्रेरणा घेऊन आपणही प्रतिसरकार स्थापन करायचे कार्यकर्त्यांनी ठरवले. संगमनेर व अकोले ही दोन तालुक्यांची ठिकाणे; तिथल्या सरकारी कचेऱ्या ताब्यात घ्यायच्या, तिथे तिरंगा फडकवायचा व आपले सरकार स्थापन करायचे या गटाने वले. पद्धतशीर सर्व योजना आखली गेली. पाठी २३ ऑक्टोबर १९४२ ही तारीख नक्की केली गेली होती. पोलिसांची कुमक तिथे पोचू नये म्हणून परिसरातले चारही रस्ते बंद करण्याचे ठरले. आसपासच्या गावांमधून भरपूर प्रचार केला गेला. अकोल्याहून वारली समाजाची खूप माणसे मोर्चाने आली. दुर्दैवाने 'पोलिसांच्या खूप गाड्या आल्या आहेत, घाटाखालचे सगळे मोर्चेवाले पळून गेले' अशा प्रकारच्या अफवा उठल्या व त्यामुळे सगळे निदर्शक पांगले. रात्रीच्या अंधारामुळे आणि डोंगराळ प्रदेशामुळे नेमके काय होते आहे हे कोणालाच कळायला काही मार्ग नव्हता. जितक्या वेगाने लोक जमले होते तितक्याच वेगाने ते पसारही झाले. सगळे कार्यकर्ते अगदी निराश झाले; इतकी मेहनत घेऊन आखलेल्या योजनेवर एकाएकी पाणी पडले होते. बेचाळीसच्या आंदोलनात... ७५