पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व संगमनेर - अकोले भागातील चळवळीला नेतृत्व देत. पाडळीप्रमाणेच सावरगावपाट हेही चळवळीचे एक केंद्र होते. त्यांचे वडीलबंधू पाटीलभाऊ यांची ही सासुरवाडी. त्यांना व दादांनाही त्या परिसरात खूप मान होता. स्वतः बरोबरच इतर भूमिगत नेत्यांना आसरा शोधण्यात त्यांचा पुढाकार असे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे भास्करराव ऊर्फ नाना दुर्वे. अहमदनगरच्या अच्युतराव पटवर्धन यांच्या संपर्कात ते नेहमी असत. अच्युतराव आणि रावसाहेब ही दोघा भावांची जोडगोळी तेव्हा स्वातंत्र्यचळवळीत चमकत होती. दोघेही तेज:पुंज आणि विद्वान पट्टीचे वक्ते आणि ध्येयनिष्ठ. त्यांचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर पोचला होता. अहमदनगर जिल्ह्यातील चळवळीची जबाबदारी मुख्यत: अच्युतराव पटवर्धन व अरुणा असफअल्ली यांच्यावर होती. त्यांच्याकडून भास्करराव मार्गदर्शन घेत आणि संगमनेर परिसरातील चळवळीला नेतृत्व देत. ते स्वतः वकील होते, शहराळलेले होते. आपल्या गौर वर्णामुळे व सुसंस्कृत देहबोलीमुळे ग्रामीण परिसरात ते उठून दिसत. तसेच त्यांना सतत चष्माही लावावा लागे. साहजिकच भूमिगत राहणे भास्कररावांना अवघड वाटायचे. त्यापेक्षा आपण पकडले गेलो तर बरे असे त्यांना वाटे. पण तुरुंगातून ते भूमिगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकले नसते. म्हणूनच त्यांनी तुरुंगाबाहेर राहावे असा अण्णासाहेबांचा आग्रह होता. त्यांना सुरक्षित जागी लपवण्याची जबाबदारी अण्णासाहेबांनी घेतली होती. पाडळी गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या शेतात अण्णाभाऊंचे चुलते आबा यांचा झाप होता - वस्तीपासून तुटलेला असा. त्या झापात अण्णाभाऊंनी भास्कररावांची राहायची व्यवस्था केली. त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था दादा व बाईंनी सांभाळली. जवळजवळ चार महिने भास्करराव तिथे राहिले. बऱ्याच वर्षांनंतर, म्हणजे १९६८ साली दादा वारल्यानंतर, भास्कररावांनी अण्णाभाऊंना एक विस्तृत हृदयस्पर्शी पत्र लि त्यात आपल्यासाठी दादा व बाईंनी किती खस्ता खाल्ल्या, किती धोका पत्करला आणि आपला सांभाळ किती मायेने केला याचे वर्णन होते. दुर्दैवाने पुढे ते पत्र वाचनासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरत असताना गहाळ झाले. अन्यथा त्या परिसरातील बेचाळीसच्या आंदोलनाबाबतचा तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला असता. भास्करराव आबांच्या झापात राहत असताना त्यांना चळवळीतील सहकाऱ्यांनी एक बुलेटिन (वार्तापत्र ) छापायचे मशिन आणून दिले होते. लेखन-वाचन, पत्रव्यवहार आणि हे बुलेटिन काढणे हे त्या चार महिन्यांतले भास्कररावांचे मुख्य काम होते. त्यावेळी वृत्तपत्रांमधून वा रेडिओवरून चळवळीच्या बातम्या तशा तुरळकच येत. त्यामुळे अशा छोट्या छोट्या वार्तापत्रांची लोक अगदी आतुरतेने अजुनी चालतोची वाट... ७४