पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे विवेचन केले आहे. शिवाय आपापल्या राजकीय विचारसरणीनुसारच आंदोलनाचे विश्लेषण करण्याची प्रवृत्ती स्वाभाविक आणि प्रबळ आहे. शेतकरी, कामगार, पांढरपेशा नोकरदार, उद्योगपती, व्यापारी, जमीनदार, संस्थानिक, धर्मगुरू, वरिष्ठ शासकीय अधिकारी, कलावंत, लेखक, पत्रकार, पोलीस दलातील वा लष्करातील कर्मचारी या सगळ्यांचाच स्वातंत्र्य आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी या सगळ्यांचाही या आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. आंदोलनातला प्रत्यक्ष सहभाग हा आपापल्या दृष्टिकोनानुसार ठरणारा असल्याने तोही साहजिकच भिन्न होता. छातीवर गोळ्या झेलणारेही भारतीय होते आणि बंदुका चालविणारे सैनिकही बहुतांशी भारतीयच होते. साहजिकच आंदोलनाबद्दल वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करता येईल; पण सर्वसाधारणतः आंदोलनाबद्दल दोन निरीक्षणे नोंदवता येतील. ९ एक म्हणजे, राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व देऊ शकणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ९ ऑगस्टलाच कारावासात टाकल्यामुळे आंदोलनाला एकसंध असे, एखादी विशिष्ट दिशा देणारे असे नेतृत्वच उरले नव्हते. ९ ऑगस्टच्या आपल्या भाषणात गांधीजी म्हणाले होते, "आता यापुढे प्रत्येक भारतीयाने 'मी स्वतंत्र झालेलो आहे' या भावनेने वागावे; कोणी काय करावे हे मी आता कोणाला सांगणार नाही." पण तशाप्रकारचे स्वयंभू नेतृत्व लोकांमधून प्रत्येक ठिकाणी निर्माण व्हावे इतकी प्रगल्भता आंदोलनकर्त्यांमध्ये नव्हती व त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी अवतीभवती उपलब्धच नव्हते. साहजिकच आंदोलनाला विस्कळित रूप लाभले होते. आज मागे वळून बघताना या आंदोलनाविषयी जाणवणारा दुसरा पैलू म्हणजे • कागदावरती पूर्णतः अहिंसक आणि शांततामय साधनशुचितेचा असला तरी प्रत्यक्षात आंदोलनाला खूपदा संघर्षाचे आणि प्रसंगी हिंसकही वळण लाभत होते. याचे अनेकांपैकी एक कारण म्हणजे बेचाळीसच्या आंदोलनामागे गांधी-नेहरूंप्रमाणेच सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांची प्रेरणाही मोठ्या प्रमाणावर होती; भगतसिंगांपासून खुदीराम बोसांपर्यंत अनेक सशस्त्र क्रांतिकारकांची प्रेरणाही सर्वसामान्य भारतीयांची स्वातंत्र्यलालसा जागवण्यासाठी कारणीभूत होती. १९३९ साली महात्मा गांधींच्या विरोधाला न जुमानता काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबू निवडून आले होते. पुढे गांधीजींबरोबरचे मतभेद पराकोटीला गेल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व फॉरवर्ड ब्लॉक हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. ब्रिटिशांनी त्यांना स्थानबद्ध केले; पण पोलीसपहारा चुकवून १६ अजुनी चालतोची वाट... ७२