पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खरडपट्टी काढायला सुरुवात केली. "पुन्हा असा प्रकार केलास तर घरातून हाकलून लावीन, " असा त्यांनी रावसाहेबांना दम भरला. इकडे किसनमामांना बघितल्यावर रावसाहेबांची बोबडीच वळली होती. पोलिसांच्या अटकेपेक्षाही आता किसनमामा काय करतील याची त्यांना भीती होती. मागे एकदा दारू आणायला बाणेदारपणे नकार देऊन त्यांनी किसनमामांना दुखावले होतेच आणि आता लगेचच पुन्हा एकदा त्यांच्याशीच पंगा घेतल्यासारखे झाले होते. शिवाय हे आता पाडळीला असलेल्या दादा-बाईंना काय सुनावतील याचीही धास्ती होती. जीव मुठीत धरूनच ते किसनमामांचे वाक्ताडन झेलत होते. किसनमामांचे बोलणे संपताच यार्दीसरांनी सुनवायला सुरुवात केली. "तुला सरकार स्कॉलरशिप देतं आणि तरीही सरकारविरोधी चळवळीत तू भाग घेतोस! हा काय प्रकार आहे? तू काय स्वत:ला सरकारचा जावई समजतोस की काय ? आम्हीही शाळेतर्फे तुला फ्रीशिप देतो; पण आम्हांलाही तू जुमानत नाहीस अन् असल्या कारवाया करतोस म्हणजे काय ?" वगैरे बरेच काही यार्दीसरांनी सुनावले. नंतर ते त्या पोलिसाला म्हणाले, "जाऊ द्या हो, शेवटी हा एक विद्यार्थी आहे. वयही कमी आहे. जेलमधे गेला तर त्याचं रेकॉर्ड आयुष्यभरासाठी खराब होईल. एकवार त्याला माफ करा. आता मी त्याला इतकं फायरिंग दिलं आहे, की पुन्हा असलं काही करायची तो हिंमतच करणार नाही. या खेपेला त्याला सोडून द्या. पुन्हा त्याच्या हातून हा प्रकार होणार नाही. तुम्ही काही चिंता करू नका, मीच त्याचा पुरता बंदोबस्त करतो." यार्दीसरांचे व्यक्तिमत्त्व खूप रुबाबदार होते. एक बुद्धिवंत म्हणून त्यांचा लौकिकही खूप होता. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या पोलिसाने रावसाहेबांना सोडून दिले. एका गंभीर संकटातून त्यांची सहीसलामत सुटका झाली. घरी पोचल्यावर किसनमामा खूप आदळआपट करतील अशी रावसाहेबांना भीती होती, मनातून ते जाम टरकलेही होते; पण आश्चर्य म्हणजे त्या दिवशी किंवा त्यानंतरही कधी किसनमामा रावसाहेबांना या प्रकरणावरून एक शब्दही बोलले नाहीत. या घटनेचा भविष्यात कधी त्यांनी उल्लेखही केला नाही. त्यांनी असे का केले याचे कोडे रावसाहेबांना आजही उलगडलेले नाही. आंदोलनात भाग घेणे रावसाहेबांनी पुढेही चालू ठेवले, पण ते करताना आपण पोलिसांकडून कधी पकडले जाणार नाही याची पुरेपूर दक्षता मात्र ते घेऊ लागले. त्यांचा चळवळीतील सहभागही हळूहळू अधिक व्यापक होत गेला. बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रत्यक्षातले स्वरूप कसे होते, बेचाळीसच्या आंदोलनात... याबद्दल