पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असंख्य पुस्तकांचा प्रचंड खजिनाच तिथे होता. अशा या सरकारवाड्याला निदर्शकांनी लावलेली आग वेळीच विझवली गेली म्हणून बरे झाले; पण ती जर भडकली असती तर ह्या सगळ्या ज्ञानसाठ्याची राखरांगोळी झाली असती आणि निदर्शकांपैकी एक या नात्याने त्या पापाचे आपणही एक वाटेकरी ठरलो असतो या जाणिवेने आज त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. शिवाय जी रेशनची दुकाने लुटली गेली, पेटवली गेली ती नंतर कित्येक दिवस बंद राहिली; तिथे मिळणारे स्वस्तातले धान्य, रॉकेल, कपडे यांच्यावर अनेक गोरगरिबांचे संसार अवलंबून होते आणि त्यांच्या तोंडचा घास पळवल्यासारखेच आपले ते कृत्य होते या जाणिवेने आज जिवाला चटका लागतो. "जमावाच्या मानसशास्त्रात तर्कशास्त्राला, सारासार विचाराला आणि विवेकाला स्थान नसते," असा निष्कर्ष त्या आठवणींतून आज रावसाहेब काढतात. पण त्यावेळी मात्र ही सर्व लुटालूट स्वातंत्र्यलढ्याचा एक अपरिहार्य भाग म्हणून क्षम्य वाटली होती; किंबहुना आपण त्या आंदोलनात सहभागी होतो याचा अभिमानही वाटला होता. 'चले जाव' आंदोलनात ते त्यानंतर अधिकाधिकच गुरफटत गेले. शेवटी या सगळ्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. एकदा शाळेसमोर पत्रके वाटताना रावसाहेबांना पोलिसांनी पकडले. यापूर्वीही एकदा त्यांना करताना पोलिसांनी पकडले होते पण केवळ ताकीद देऊन सोडून दिले होते. पण या खेपेला मात्र अटक करून त्यांना शाळेचे प्रिन्सिपॉल यार्दीसर यांच्यासमोर उभे केले गेले. रावसाहेबांचे स्थानिक पालक म्हणून यार्दीसरांनी किसनमामांना बोलावून घेतले. त्यांना काय घडले ते थोडक्यात सांगितले. पण ते सगळे सांगायची तशी गरजही नव्हती. पोलिसांच्या ताब्यात रावसाहेबांना पाहताक्षणी काय घडले असेल चीकिसनमामांना कल्पना आली. रावसाहेबांच्या या हालचाली त्यांच्या कानावर जातच होत्या व तो सगळा प्रकार त्यांना अजिबात मंजूर नव्हता. ब्रिटिशांविरुद्ध देशभर आंदोलन पेटले होते हा भाग जरी खरा असला तरी हे आंदोलन वगैरे सगळा मूर्खपणा आहे, ब्रिटिश सरकारच्या जबरदस्त ताकदीपुढे अशा फुटकळ आंदोलनांचा जरासुद्धा टिकाव लागणे शक्य नाही, आणि मुख्य म्हणजे ब्रिटिश शासन सर्वसामान्य भारतीयांच्या भल्याचेच आहे असे मानणाराही एक मोठा वर्ग त्यावेळी देशात होता हेही तेवढेच खरे आहे आणि किसनमामांचा समावेशही त्याच वर्गात होता. त्यांच्या वखारीतील लाकडाचे ब्रिटिश सरकार हे एक मोठे गि-हाईकही होते. सरकारविरोधी कारवाया त्यांना मुळीच मंजूर नव्हत्या. साहजिकच आता याक्षणी त्यांचा पारा एकदम चढला. अतिशय कठोर शब्दांत त्यांनी रावसाहेबांची अजुनी चालतोची वाट... ७०