पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गेले. तिथेच त्यांना बंदिवासात ठेवले गेले. नेहरू, पटेल, आझाद वगैरे उर्वरित सर्व पुढाऱ्यांना घेऊन तीच आगगाडी पुढे अहमदनगरला नेली गेली. तिथल्या किल्ल्यात त्यांना कैद केले गेले. अर्थात अधिकृतरीत्या यांतली कुठलीच घटना सरकारतर्फे जाहीर केली गेली नव्हती, पण कर्णोपकर्णी बातम्या वणव्यासारख्या पसरत गेल्या आणि घरोघर पोचल्या. सरकारने त्याच सकाळी देशभर कलम १४४ जाहीर केले व त्याअन्वये पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घातली. पण त्या बंदीहुकूमाला न जुमानता लोक रस्त्यावर आले. मिरवणुका, मोर्चे, हरताळ यांचा आगडोंब देशभर उसळला. या सगळ्या घडामोडींपासून नाशिक शहर मुक्त राहणे अशक्यच होते. नाशकातही न भूतो न भविष्यति अशी निदर्शने सुरू झाली. 'चले जाव', 'करेंगे या मरेंगे अशा घोषणा देत लोक जागोजागी रस्त्यावर उतरले. घोषणा देत आणि मोर्चे काढत शहरात जागोजागी लोक एकत्र जमले होते. काँग्रेसच्या जोडीने राष्ट्रसेवादलाचे सैनिकही यात सामील होते. सरकारवाडा हे निदर्शकांचे एक लक्ष्य होते व तिथल्या गर्दीत रावसाहेबही होते. सरकारवाड्यात पोलीस स्टेशन होते. शेजारीच युद्धकाळात सरकारने सुरू केलेले रेशनच्या धान्याचे, नियंत्रित दराच्या रॉकेलचे व स्वस्त कापडाचे अशी दुकानेही होती. दुकाने लुटणे व आगी लावणे सुरू होते. पोलीस बंदोबस्त प्रचंड होता, पण लोक आवरेनात. निदर्शकांनी दगडही फेकायला सुरुवात केली. पोलिसांनी लाठीमार केला, अश्रूधुराची नळकांडी फोडली पण तरीही लोक हटेनात. शेवटी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. आता मात्र लोकांची पांगापांग सुरू झाली. तसे पाहिले तर ही लढाई खूप विषमच होती. निदर्शक नि:शस्त्र होते, तर पोलीस शस्त्रसज्ज आणि शिवाय प्रशिक्षित. अशा पोलीसदळापुढे फार वेळ जमावाचा टिकाव लागणे अशक्यच होते. जीव मुठीत धरून लोक सैरावैरा पळू लागले. चौदा (प्रत्यक्षात पंधरा वर्षांचे रावसाहेब त्यातून कसेबसे वाचले. अशाप्रकारे रस्त्यावर उतरायचा, सार्वजनिक निदर्शनांत भाग घ्यायचा, पोलिसांचा लाठीमार, अश्रूधूर आणि बंदुकीच्या गोळ्या यांच्या सान्निध्यात वावरायचा रावसाहेबांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. खूप रोमांचकारी असा हा अनुभव होता, भावनातिरेकाने भारावून टाकणारा होता. पुढे कालांतराने या प्रसंगाकडे वळून पाहताना रावसाहेबांना त्या अनुभवाची एक दुसरी, क्लेशदायक बाजूही जाणवते. ज्या सरकारवाड्याला निदर्शकांनी आग लावली होती त्याच सरकारवाड्यात वरच्या मजल्यावर त्यांचे आवडते नाशिकचे सार्वजनिक वाचनालय होते. याच वाचनालयात रावसाहेबांना वाचनवेड लागले होते, त्यांना खूप आवडलेल्या त्यांच्यावर मोलाचे संस्कार केलेल्या बेचाळीसच्या आंदोलनात... ६९