पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ ऑगस्ट. "आमचे काय वाटेल ते होईल, पण ब्रिटिशांनी हा देश सोडून ताबडतोब निघून जावे,” अशी मागणी करणारा ठराव अधिवेशनात मांडला गेला. पंडित नेहरूंनी आजही अधिवेशनात भाषण केले. 'चले जाव' या ठरावावर भाषण करताना ते संतापाने थरथरत होते. ते म्हणाले, "आज आम्ही सारे पाश तोडून टाकून अखेरच्या युद्धाला तयार झालो आहोत. या मुकाबल्यात यशस्वी झालो तर स्वतंत्र हिंदुस्थानच्या भूमीवरच उभे राहू; नाहीतर खवळलेल्या ह्या दर्यात बुडून }} मरून जाऊ. 'चले जाव'चा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला. आता अधिवेशनाच्या समारोपाची वेळ आली होती. तोच अगदी अनपेक्षितपणे महात्मा गांधी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी रात्रीचे साधारण दहा वाजले होते. गांधीजी म्हणाले, "हिंदुस्थान स्वतंत्र होण्याची हीच वेळ आहे. ही संधी मी दवडली तर मी बेवकूफ ठरेन. आता यापुढे प्रत्येक भारतीयाने 'मी स्वतंत्र झालेलो आहे' याच भावनेने वागावे. कोणी काय करावे हे आता मी कोणाला सांगणार नाही. 'करेंगे या मरेंगे' हाच आजच्या घडीचा मंत्र आहे." महात्मा गांधींचे हे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी व अनपेक्षितरीत्या दिले गेलेले पण काळाच्या ओघात ऐतिहासिक महत्त्वाचे ठरलेले भाषण तब्बल दोन तास व दहा मिनिटे चालले! समोरचा अफाट जनसागर देहभान हरपून त्यातला शब्दन्शब्द निःशब्द ग्रहण करत होता. आवाज होता तो फक्त मागे पसरलेल्या अफाट अरबी समुद्रावरच्या लाटांचा. भाषण संपले. 'छोडो भारत'च्या गर्जनांनी आसमंत दुमदुमला. अत्यंत चैतन्यमय वातावरणात अधिवेशनाची सांगता झाली. ९ ऑगस्ट. कालच्या ऐतिहासिक अधिवेशनाची बातमी वृत्तपत्रांतून व रेडिओद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली. एरवीही देशाचे डोळे या अधिवेशनाकडे लागलेलेच होते. पण लोकांचा दिवस पुरता उजाडायच्या आधीच, पहाटे पाच वाजताच, मुंबईच्या बिर्ला हाउसमध्ये मुक्काम केलेल्या महात्माजींना सरकारने ताब्यात घेतले होते. बोरीबंदर स्टेशनवर त्यांना नेले गेले. त्याच्या आधीच, अधिवेशनाच्या जागीच, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांना अटक झाली होती. त्यांनाही बोरीबंदरला आणले गेले. या सर्व नेत्यांना घेऊन एक खास आगगाडी पुण्याच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊ वाजता ती चिंचवड स्टेशनवर थांबली. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई व मीराबेन या चौघांना प्लॅटफॉर्मवर उतरवले गेले व एका पोलीस व्हॅनमधून नगररोडवरच्या आगाखान पॅलेसमध्ये नेले अजुनी चालतोची वाट... ६८