पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बीजही मनात कुठेतरी पेरले गेले होते. विचार हा महत्त्वाचा असतोच, पण जेव्हा त्या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळते, तेव्हा त्या विचाराची तीव्रता खूप वाढते. सेवादलातील सहभागामुळे कामाची प्रेरणा मिळालीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कृतीची संधीही मिळाली. जमिनीची मशागत होणे आणि बीज पेरले जाणे एवढेच पुरेसे नसते; बीज अंकुरण्यासाठी खतपाणीही मिळावे लागते, भोवती पूरक वातावरणही असावे लागते आणि मुख्य म्हणजे योग्य तो क्षणही यावा लागतो. नाशिकमधल्या त्या दिवसांमध्ये हे सगळे घटक जुळून आले. गोविंदराव देशपांडेसारख्यांचे जळजळीत वक्तृत्व, सार्वजनिक वाचनालयातले वाचन, सानेगुरुजींचा सहवास, कुसुमाग्रजांच्या कविता, सेवादलाच्या उपक्रमांमधील सहभागामुळे अंगी बाणलेली कृतिशीलता, देश ढवळून काढणारा स्वातंत्र्यलढा आणि शिवाय रावसाहेबांची कोवळी, संस्कारशील तरुणाई या सर्वांचा एकत्रित परिणाम भारावून टाकणारा होता, नवनवोन्मेष फुलवणारा होता. "Bliss was it in that dawn to be alive; But to be young was very heaven!" ("त्या पहाटे जिवंत असणे हा परमानंद होताच; पण त्यावेळी तरुणही असणे म्हणजे तर प्रत्यक्ष स्वर्गसुखच होते !") अशा अजरामर ओळींमध्ये विलियम वर्डस्वर्थने फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिवसांचे वर्णन केले आहे. नाशिकमधल्या त्या दिवसांनाही या ओळी उत्तम लागू पडतात. ७ ऑगस्ट १९४२. मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिवेशन सुरू झाले. मौलाना अबुल कलाम आझाद अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू वगैरे नेत्यांची भाषणे झाली. त्यावेळी युरोपात दुसन्या महायुद्धाचा आगडोंब उसळला होता. टलरने जोरदार मुसंडी मारली होती आणि ब्रिटिश सरकार हादरले होते. हिंदुस्तानातून उभे राहू शकणारे प्रचंड मनुष्यबळ आणि इथून उपलब्ध होऊ शकणारा अमर्याद कच्चा माल यांवर ब्रिटनची मोठी भिस्त होती. भारताने युद्धप्रयत्नात मनापासून सहकार्य द्यावे यासाठी मर्यादित स्वातंत्र्याचे आमिष ब्रिटिशांनी भारतीय जनतेला दाखवले होते. त्यासाठीच केलेली एक योजना घेऊन मार्च १९४२मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स हे ब्रिटिश मुत्सद्दी भारतात आले होते, इथल्या नेत्यांना भेटले होते. पण त्यांची योजना भारतीय नेत्यांनी फेटाळून लावली होती. त्याचीच कारणमीमांसा आपापल्या भाषणात काँग्रेसनेते करत होते. सगळ्यांचीच भाषणे ओजस्वी होती. बेचाळीसच्या आंदोलनात...