पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चार वेळा दारू आणण्यासाठी याच दुकानात त्यांनी रावसाहेबांना पाठवले होते. सांगितलेले ऐकायचे या आज्ञाधारक वृत्तीने रावसाहेबांनी ते काम केलेही होते. दारूचे दुष्परिणाम रावसाहेबांनी खूप पाहिले होते, अनेकांचे संसार या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाल्याचेही त्यांनी पाहिले होते. त्यांचे आजोबा (आईंचे वडील) खूप संपन्न घरातले होते; पण त्यांचा एक मुलगा दारूच्या आहारी गेला व त्यामुळे सगळ्या घराण्याचे वैभव धुळीला मिळाले होते. खूप जवळून पाहिलेल्या अशा काही उदाहरणांमुळे दारूचा त्यांना तिटकाराच होता. दारूबंदी आंदोलनात भाग घ्यायला सुरुवात केल्यावर तो तिटकारा अधिकच तीव्र झाला. त्या सुमाराचा एक अनुभव खूप बोलका आहे. किसनमामांनी त्यांच्या हाती पैसे दिले व त्यांना नेहमीच्या दुकानातून दारूची बाटली आणायला सांगितले. पण पूर्वीचे सांगितलेले काम बिनबोभाट करणारे रावसाहेब आता बदलले होते. व्यापक सामाजिक कामातील सहभागामुळे एक वेगळाच बाणेदारपणा त्यांच्यात आला होता. हातात दिलेले पैसे त्यांनी किसनमामांच्या अंगावर फेकले आणि " असलं घाणेरडं काम मी यापुढे करणार नाही,” असे तडकावून सांगत ते तिथून चालते झाले. भावनेच्या भरात त्यांनी हे केले खरे, पण नंतर मात्र ते मनातून घाबरले. किसनमामांचा दरारा खूप होता आणि सगळेच त्यांना टरकून असत. शिवाय काहीही झाले तरी ते किसनमामांकडे एखाद्या आश्रितासारखेच राहत होते; किसनमामांनी संतापून घराबाहेर काढले तर आपल्याला नाशकात आसरा देणारे दुसरे कोणीच नाही याची त्यांना जाणीव होती. पाडळीतल्या घरच्या खालावलेल्या परिस्थितीचीही त्यांना कल्पना होती. पुढचे शिक्षणही बंद पडायचा धोका समोर होता. आपण किसनमामांचा भलताच अपमान केला, आता याचे काय काय दुष्परिणाम भोगावे लागतील कोण जाणे या कल्पनेने ते धास्तावले. सुदैवाने किसनमामांनी या घटनेवर कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही; पण दारू आणण्याचे कामही त्यांनी नंतर कधी रावसाहेबांना सांगितले नाही. एखाद्या व्यापक ध्येयासाठी स्वत:ला झोकून दिले, की सामान्य माणसाच्या अंगी ही असामान्य धाडस कसे निर्माण होते याचे हा प्रसंग म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहिले तर स्वातंत्र्यचळवळीबाबतचे विचार रावसाहेबांच्या डोक्यात लहानपणापासूनच घोळत होते. दादांना भेटायला येणाऱ्या मंडळींच्या गप्पांमध्ये हा विषय नेहमी असे. शिक्षणासाठी दूर राहणारे अण्णाभाऊ जेव्हा पाडळीला घरी सुट्टीवर येत त्यावेळी तेही चळवळीबद्दल भरभरून सांगत असत. डॉ. भुतेकरही नेहमी स्वातंत्र्यलढ्याची चर्चा करत. एका अर्थाने रावसाहेबांच्या मनाची योग्य ती मशागत पूर्वीच झाली होती; आपणही चळवळीत सहभागी व्हावे या विचाराचे अजुनी चालतोची वाट... ६६