पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेचाळीसच्या आंदोलनात वाचनाने संस्कारित झालेले रावसाहेबांचे युवामन स्वातंत्र्यचळवळीकडे आकृष्ट झाले यात काहीच नवल नाही. ते राहत असलेले किसनमामांचे घर ज्या पंचवटी भागात होते त्या पंचवटीतच कारंज्याजवळ राष्ट्रसेवादलाची एक शाखा भरायची. तिथे ते नियमित जाऊ लागले; सैनिक बनले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जसे सदस्यांना 'स्वयंसेवक' म्हणत तसेच सेवादलाच्या सदस्यांना 'सैनिक' म्हणत. लौकरच ते या पंचवटी शाखेचे शाखानायक झाले. सहभोजने, बौद्धिके, प्रभातफेऱ्या, रस्तेसफाई अशा सेवादलाच्या विविध उपक्रमांत उत्साहाने भाग घेऊ लागले. चांदवडकर लेनमधल्या नेहरू चौकात काँग्रेस पक्षाच्या सभा होत. त्यात बरीच देशभक्तिपर भाषणे व्हायची. त्या सभांनाही रावसाहेब हजर असत. त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो गोविंदराव देशपांडे यांच्या वक्तृत्वाचा. त्यावेळी लाउडस्पीकर फारसे प्रचलित नव्हते, पण गोविंदरावांना त्याची गरजच नसायची. त्यांचा आवाजच इतका खणखणीत आणि पल्लेदार असे, की हजारोंच्या सभेतही तो अगदी शेवटच्या रांगेपर्यंत स्पष्ट ऐकू जाई. 'नाशिकची मुलूखमैदान तोफ' असेच त्यांचे वर्णन केले जाई. त्यांचे भाषण आहे असे कानावर आले, की हातातली सगळी कामे बाजूला टाकून रावसाहेब व त्यांचे मित्र सभास्थानी धाव घेत. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध गोविंदराव अगदी आग ओकत, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडत. प्रत्यक्ष भाषणाप्रमाणेच त्यांचे हावभाव ( देहबोली किंवा बॉडी लँग्वेज) आणि एकूण व्यक्तिमत्त्वही खूप प्रभावी होते. एक वक्ता म्हणून त्यांच्याकडून रावसाहेबांना खूप काही शिकता आले. स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग म्हणजे दारूबंदीसाठीचे आंदोलन निदर्शने करून दारूचे गुत्ते बंद पाडावेत असा गांधीजींचा आदेश होता. पंचवटीत एका पारशी माणसाचे दारूचे दुकान होते. किसनमामा दारू पीत असत व पूर्वी दोन- बेचाळीसच्या आंदोलनात...