पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि वागण्या-बोलण्यातल्या आत्मविश्वासामध्येही दिसत होती. तिथली एकही व्यक्ती अशिक्षित असावी असे वाटत नव्हते; उलट त्यांच्या बोलण्यात अधूनमधून सराईतपणे इंग्रजीही येत होते. जेवणासाठी २०-२५ माणसे जमली होती. तिथल्या चार-पाच तरी तरुण मुलामुलींच्या हातात अत्याधुनिक मोबाइल होते व त्यांच्यावर उपस्थितांचे फोटोही काढले जात होते! नवल म्हणजे गावातल्या कोणालाही यात काहीही आश्चर्य वाटत नव्हते! जणू मोबाइलवरती फोटो काढणे हे त्यांच्या दृष्टीने नेहमीचेच होते. दिल्ली-मुंबईतही या मॉडेलचे मोबाइल तसे अलीकडेच आले होते आणि अल्पावधीत ते इथे पाडळीतही पोचले होते. मागे उल्लेख केलेली शहरी व ग्रामीण भागातल्या विकासातली दरी निदान त्या घराततरी दिसली नाही. तिथे हजर असलेल्या एका शिंदे परिवारातल्याच २४-२५ वर्षांच्या मुलीने, पाटीलबुवांच्या नातीने, नुकताच नाशिकला एक 'टी बार' काढला होता, तिथे ती दीडशे प्रकारचा चहा विकत होती; आणि तेही एका कपाला कमीत कमी शंभर रुपये या दराने! आणि अशा शंभर टी बार्सची एक चेन काढायचे तिचे स्वप्न होते ! दुसऱ्या दिवशी नाशिकला गेलो असताना तिथला तो तिचा पहिला टी बार बघताही आला. ज्या गावातली एकही मुलगी एकेकाळी शाळेतही जात नव्हती त्याच गावातली एक मुलगी आज हे भव्य स्वप्न पाहत होती! रावसाहेबांच्या लहानपणचे पाडळी आणि आताचे पाडळी यांच्यातल्या स्थित्यंतराचे तो प्रसंग म्हणजे एक प्रतीक होते. हे स्थित्यंतर सर्वव्यापी नाही आणि अनेक वंचित समाजघटकांना प्रगतीचा खूप मोठा पल्ला अजून गाठायचा आहे हे तर अगदी उघडच आहे, त्याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही; पण झालेले स्थित्यंतरही खूप मोठे आहे हेही अमान्य करता णार नाही. रावसाहेबांची कहाणी ही इतर अनेक गोष्टींबरोबर गेल्या साठ-सत्तर वर्षांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घडून आलेल्या या स्थित्यंतराचीही कहाणी आहे. ■ अजुनी चालतोची वाट... ६२