पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नव्हे तर ज्या घरी आजारी माणसाला उपचार करायचा, त्या घरचेही ते काहीच घेत नसत. दादांची व त्यांची खूप मैत्री होती. घरी नेहमी जेवायला येणारी दुसरी व्यक्ती म्हणजे पाडळीच्या शाळेतले मास्तर श्रीधर शामराव काळे- कुलकर्णी. तेही ठाणगावचे ब्राह्मण. त्यांच्याविषयी रावसाहेब लिहितात : "श्रीधरमास्तर आमच्या गावी शाळेत रुजू झाले ते पेन्शन घेईपर्यंत तिथेच राहिले. 'मास्तर' म्हटले की तेच सर्वांना अभिप्रेत असत. ठाणगाववरून रोज सकाळी कधी पायी तर कधी घोड्यावरून ते पाडळीला शाळेसाठी येत. बहुधा त्यांचा जेवणाचा डबा बरोबर असायचा. पण तसे नसल्यास त्यांचे जेवण हमखास आमच्या घरी असायचे. अशावेळी पाण्यासाठी कासंडी घेऊन ते गावातील जवळच्याच विहिरीवर जात व हातपाय धुऊन येत. त्यांची स्वयंपाकाची व जेवणाची जागा सारवलेली असे. स्वयंपाकासाठी त्यांना शिधा दिला जात असे. पिठले व भात शिजला की दादा आणि ते समोरासमोर बसून जेवत. सोवळेओवळे तेही कटाक्षाने पाळीत. मास्तरांची व दादांची मैत्री अखेरपर्यंत अतूट राहिली. प्रापंचिक प्रश्नांत त्यांची सल्लामसलतही चाले. दोन्हीही कुटुंबे जवळ आली होती.” ( ध्यासपर्व, पृष्ठ ११) जातिभेद असले, सोवळेओवळे पाळले जात असले तरी त्या गोष्टी केवळ परंपरेने चालत आलेली एक रीत म्हणून केल्या जात ; वेगवेगळ्या जातींमधील एकूण संबंध सलोख्याचेच होते, त्यांच्यात परस्परद्वेष नावालाही नव्हता; अशीच साधारण रावसाहेबांची निरीक्षणे आहेत. गावात पाणीवाटप ज्या सामंजस्याने केले जाई, तंटेबखेडे ज्या सामोपचाराने मिटवले जात तो गावजीवनातील सलोखा रावसाहेबांना आजही मोहित करतो. उदाहरणार्थ, पाडळी गावातील 'इर्जुक' ही प्रथा. या प्रथेनुसार एखाद्या अडलेल्या- नडलेल्या गरीब शेतकऱ्याचे शेत गावकरी सामुदायिकरीत्या नांगरून, पेरून द्यायचे. तो शेतकरी कुठल्या जातीचा आहे, सवर्ण आहे का दलित, याचा विचारही कोणी करत नसे. गरजू गावकऱ्याची गरज भागवणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे हीच भावना त्यांच्यामध्ये असायची. एका अर्थाने भावी काळातील सहकारी चळवळीचा एक धागा आपल्याला या 'इर्जुक' प्रथेशीही जोडता येईल. माणसा-माणसातली स्पर्धा ही नैसर्गिक असेल, पण त्याचप्रमाणे परस्परसहकार्य हेही नैसर्गिकच आहे हे सूचित करणारेही असे अनेक अनुभव रावसाहेबांना अजुनी चालतोची वाट... ६०