पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्यशोधक समाजाच्या प्रभावाखालील दादांनी मात्र आपल्या सातही मुलांना देवीची लस टोचून घेतली होती, हे नमूद करायला ते विसरत नाहीत. घरकामात आणि शेतीकामात खूप कष्ट करणे हा त्याकाळी एकूण शेतकरी संस्कृतीचाच एक भाग होता आणि गडी बायांबरोबर सधन शेतकरी स्वत:ही आपल्या मुलाबाळांसकट दिवसभर काबाडकष्ट करत; म्हणजेच शरीरकष्टांचा संबंध गरिबीपेक्षा श्रमसंस्कृतीशी अधिक होता. लोक जातिभेद पाळत, अस्पृश्यता अस्तित्वात होती हे रावसाहेब मोकळेपणे कबूल करतात, पण त्यातून एकमेकांविषयी द्वेषभावना निर्माण होत नव्हती असेही ते म्हणतात. एकूणच जातिभेदांविषयीच्या त्यांच्या आठवणी कटुतारहित व म्हणून खूप आगळ्यावेगळ्या अशा आहेत. बऱ्याच अंशी जातिभेद हे बलुतेदार पद्धतीशी निगडित होते. लोहार, सुतार, कुंभार व न्हावी हे बलुतेदार पाडळीत नव्हते, ते गरजेनुसार ठाणगावहून येत; पण गावाच्या एकूण गरजा गावातच भागल्या जायच्या. लग्नामध्ये वाजंत्री वाजवणारे दलित समाजातले असत. गावचा न्हावी लग्नात दिला जाणारा अहेर मोठ्याने ओरडत जाहीर करायचा. पंगतीत पाणी वाढण्याचे कामही त्याच्याकडेच असे. चिमाजी चर्मकार कातडी मोटा, चाबूक, वहाणा, घोड्याची मोहोरकी अशा वस्तू बनवत. त्यांची कमाईही चांगली असे. त्यांचे स्वतःचे माडीचे घर होते. सगळे त्यांना ‘चिमामामा' म्हणत. काहीही गोडधोड केले की ते शिंदे बंधूंना आपल्या घरी खाण्यासाठी बोलवत, त्यांच्यावर खूप प्रेम करत. पुढे रावसाहेब व अण्णासाहेब जेव्हा कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय होते व सरकारने बंदी आणल्यामुळे जवळजवळ सर्वच कम्युनिस्ट नेते भूमिगत होते तेव्हा शामराव व गोदाताई परुळेकर या कॉम्रेड जोडप्याला सांभाळण्याची जबाबदारी काही आठवडे रावसाहेबांवर होती व त्यांनी त्यावेळी परुळेकर जोडप्याला काही दिवस चिमामामांच्या माडीवरच लपवले होते. पांडुरंगदादा गावचे पाटील असूनही गावातील हरिजन मंडळींशी त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. रावसाहेबांचे मित्रही सगळ्या जातीजमातींतील होते. दादांना भेटण्यासाठी सगळ्या जातीजमातींची मंडळी त्यांच्या घरी येत. त्यात कोष्टी, कोळी, बुरूड, तेली, ब्राह्मण, मुस्लिम अशा सगळ्या समाजांतले मित्र असत. सगळ्यांचे अगत्याने स्वागत होई. उदाहरणार्थ, ठाणगावचे सवाईदादा. हे एक वैद्यकी करणारे ब्राह्मण गृहस्थ. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. ते लोकांना औषधोपचार करत. गावोगाव ते घोड्यावरून फिरत. नाडी परीक्षेवर त्यांचे आजाराचे निदान असायचे. आयुर्वेद पद्धतीची झाडपाल्यांची त्यांची औषधे असायची. उपचारांच्या बदल्यात ते एक पैसाही कोणाकडून घेत नसत. इतकेच नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ५९