पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मालकीची होती; बव्हंशी मालक ब्रिटिशच होते. खुद्द ब्रिटनमधली कारखानदारी ( उदाहरणार्थ मँचेस्टरच्या कापडगिरण्या) भारतातून येणाऱ्या कच्च्या मालावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून होती. भारतीय उद्योगक्षेत्रात त्यावेळी मंदी होती. १९१५ ते १९१९ या पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धकार्याला मदत म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन झाले होते व त्याचे साठे नंतर अनेक वर्षे पडून होते. त्यात भर म्हणजे २३ ते २९ ऑक्टोबर १९२९ दरम्यान वॉल स्ट्रीटवर झालेला अमेरिकन स्टॉक मार्केटचा 'क्रॅश' व त्यातून उद्भवलेले 'ग्रेट डिप्रेशन'. (२२ ऑक्टोबर १९२९ रोजीची भावपातळी गाठायला अमेरिकन शेअर मार्केटला पुढली २९ वर्षे, म्हणजे १९५८ पर्यंत वाट पाहावी लागली; इतका तो 'क्रॅश' जबरदस्त होता.) त्यातून ब्रिटनमध्येही मंदी आली व भारतातून कच्चा माल खरेदी करणे त्यांनी जवळपास थांबवले. या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सर्वाधिक फटका भारतीय शेतीला बसला. उदाहरणार्थ, १९२८ ते १९३४ या सहा वर्षांच्या कालखंडात भारतातील गव्हाच्या किंमती १९२७ सालच्या किमतीपेक्षा ५० टक्के कमी होत्या. साहजिकच शेतकऱ्यांचे जिणे अत्यंत हलाखीचे बनले. याच्या पाडळीतील आपल्या वडलांवर झालेल्या परिणामांचे वर्णन करताना रावसाहेब म्हणतात : "माझे आजोबा पिशवीत चांदीचे राणीछाप रुपये घालून, घोड्याच्या टांग्यात बसून एकेकाळी सिन्नरच्या कचेरीत जात आणि जमिनींची खरेदीखतं करून घेत. शेतीतील मंदीमुळे दादा कर्जबाजारी झाले आणि जमीन ठाणगावच्या सावकाराकडे गहाण पडली. दादांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. याविषयी लोकांमध्ये बोलणं होऊ लागलं. एकटे असले म्हणजे दादा कष्टी असत, खिन्न असत, गप्पगप्प असत. शेता मजुरी करणाऱ्या महिलेची दिवसाची मजुरी दीड आण्यावरून एका आण्यावर आली होती. गड्याला देण्यात येणारी तीन आणे रोजाची मजुरीही दोन आण्यांवर आली होती. गावात पैशाचा व्यवहार फारसा नसायचाच. रुपयाचं नाणं दृष्टीस पडणंही मुश्कील झालं होतं; कधी दिसलंच तर ते नाणं अगदी गाडीच्या चाकाएवढं मोठ्ठे भासायचं; नजरेत पडायचा तो फक्त आणा, पैसा आणि ढब्बू." पण त्या काळातली ही समाजाची दैन्यावस्था विचारात घेऊनही तो सगळा कालखंड काळ्या रंगात रंगवणे रावसाहेबांना मान्य नाही. आज मागे वळून बघताना त्या काळातल्या अनेक चांगल्या बाबीही ते अधोरेखित करतात. उदाहरणार्थ, देवीची लस टोचून घ्यायला लोक अंधश्रद्धेपोटी घाबरायचे हे सांगतानाच अजुनी चालतोची वाट... ५८