पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्थ, प्रसूतीसाठी गावात दुसरी कुठचीच वैद्यकीय सुविधा त्यांना उपलब्ध नव्हती असाही होतो आणि त्यातून एकूण दारिद्र्यच अधोरेखित होते. हाच प्रकार गावात येणाऱ्या भटक्या वैद् लोकांच्या बाबतीत. शेतातील उंदरांची बिळे ते टिकावाने उकरत, उंदरांना पकडत व त्यातली कोवळी पिलावळ भाजून खात. त्यावरच त्यांची दिवसाची गुजराण चाले. हीदेखील दारिद्र्याचीच परमावधी. भारतातील गरिबी ही तशी शतकानुशतके चालत आलेली आहे पण त्या काळात या गरिबीचे रूप खूप विदारक असे होते. याचे एक मुख्य कारण म्हणजे शेतीमालाच्या कोसळलेल्या किमती. बाजरी हे शिंदे यांच्या शेतातले मुख्य धान्य. ती साधारण दहा-पंधरा पोती पिकायची. एक पोते म्हणजे आजच्या हिशेबात साधारण ११० किलो म्हणता येईल. स्वतःच्या गरजेपुरती घरी ठेवून वरकड बाजरी विकण्यासाठी बैलगाडीत भरून सिन्नरच्या बाजारात नेली जाई. बारा- चौदा मैलांचे हे अंतर दिवस उगवायच्या आत शेतकरी गाड्या बाजारात रांगेने लावून ठेवत. व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार नऊ-दहा वाजता मालाची विक्री होई. बाजरीच्या एका पोत्याला जेमतेम सहा-सात रुपये भाव मिळायचा. शेतकरी पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अवलंबून असत. परिस्थितीचा फायदा घेऊन व्यापारी कमीत कमी भावात सौदा ठरवत. माप झाल्यावर दुपारपर्यंत मालाच्या पैशांची वाट पाहत उपाशीतापाशी बसावे लागे; तेव्हा एकदाचे चार पैसे हाती येत. त्याच्यातूनच बाजारात विकायला आलेल्या इतर काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी कराव्या लागत. संध्याकाळी घरी पोचेस्तोवर फारच थोडे पैसे गाठीशी शिल्लक राहत. दोन पैशांच्या नाण्याला ढब्बू पैसा म्हणत व धान्याचे पैसे आले, की त्यातले एखादे नाणे देऊन त्याची बाजारात मिळणारी आदपाव जिलेबी मुलांची हौस फिटावी म्हणून विकत तली जाई. त्या क्षणाची मुले महिनोन्महिने वाट बघत असायची आणि ही जिलबी एकदाची खायला मिळाली म्हणजे अगदी स्वर्ग गाठल्यासारखे वाटायचे. शेतकऱ्यांच्या या दैन्यावस्थेला भारताचे पारतंत्र्यही कारणीभूत होते. ब्रिटनला लागणाऱ्या कच्च्या मालासाठीचा स्रोत आणि पक्क्या मालासाठीची बाजारपेठ म्हणूनच सत्ताधारी ब्रिटिश भारताकडे पाहत होते. त्यांच्या पुढाकारामुळेच त्या काळात भारतीय शेतकरी तंबाखू, ऊस, कपाशी, तेलबिया अशा नगदी पिकांकडे (कॅश-क्रॉप्सकडे) मोठ्या प्रमाणावर वळू लागला. या पिकांना भावही चांगला मिळे. कारण सिग्रेट, साखर, कापड, एडिबल ऑइल वगैरे बनवणाऱ्या कारखानदारीची ती मागणी होती. यातली फारच थोडी कारखानदारी भारतीय नाशिकच्या मोठ्या अवकाशात...