पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जवळजवळ नाहीतच, असे म्हणावे लागेल. पप्पा मात्र वेगळे आहेत. मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते, की एकत्र कुटुंबाचे सर्व फायदे आम्ही अनुभवतो आहोत. पप्पांच्या स्वभावामुळे खूप जण त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या समस्या घेऊन येतात. पप्पापण अतिशय आत्मीयतेने समस्या सोडवण्यास मदत करतात. बऱ्याच वेळा मी गमतीने पप्पांना म्हणते, 'तुम्ही माझे व मम्मीचे आभार मानायला पाहिजेत! आम्ही दोघीही एकदम गुण्यागोविंदाने राहतो म्हणून. आमचेच जर भांडण सुरू झाले, तर तुमचे सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प होतील आणि घरातील भांडण सोडवणे किती कठीण असते, याचा अनुभव तुम्हालाच घ्यावा लागेल!" यावर आम्ही सर्वजण हसतो." शिंदे कुटुंबातील हे एक वेगळेपण बहुसंख्य ग्रामीण परिवारांच्या पार्श्वभूमीवर खूप उठून दिसणारे आहे. आजही आपल्या सार्वजनिक जीवनात खूपदा स्त्रियांना योग्य तो मान वा सहभाग दिला जात नाही, त्यांना यथोचित श्रेय दिले जात नाही, खूपदा त्यांचा उल्लेखही केला जात नाही. कधी हे संकोचामुळे किंवा सवयीमुळेही होते. असे काही झाले, की रावसाहेब तिथल्या तिथे हस्तक्षेप करून ती चूक दुरुस्त करतात. अंधश्रद्धा, स्त्रियांची अवनत स्थिती किंवा बालपणी पाडळीच्या शाळेत बसतानाही लक्षात यायचा तो जातिभेद ही समाजाच्या एकूण मागासलेपणाचीच लक्षणे होती. या मागासलेपणाचे एक मोठे कारण निरक्षरता हे होते. दादांचा अपवाद वगळता थोडेफारतरी औपचारिक शालेय शिक्षण झालेले गावात कोणीच नव्हते. शिंदे यांच्या घरी रामायण-महाभारतातील गोष्टींची छोटी पुस्तके होती, तुकारामांची गाथा होती, पण त्याव्यतिरिक्त वाचन असे कोणाचेच नसे. स्त्रियांना तर शिक्षणाचा गंधही नसायचा. पाडळीतल्या व देवठाणमधल्या शाळेत एकही मुलगी नव्हती. बराचसा मागासलेपणा हा गरिबीतूनही आलेला होता. साधा साबणही पाडळी गावात कोणाला माहीत नव्हता; दगडाने अंग घासूनच अंघोळ केली जाई. रावसाहेबांनी आयुष्यात पहिल्यांदा अंगाला साबण लावला तो वयाच्या बाराव्या वर्षी; आपल्या मामाकडे गेले असताना. पाडळीलगतच्या डोंगर कुशीत ठाकरवाडी होती. तिथल्या ठाकर स्त्रिया गरोदर असतानाही दिवसभर काम करायच्या. कधी कधी रानातच बाळंतही व्हायच्या, झाडाझुडपांचा आश्रय घ्यायच्या, लगेच जवळपासच्या ओढ्यावर अंघोळ करायच्या, बाळालाही अंघोळ घालायच्या आणि बाळाला पाजले की पाठकुळीला बांधून परत कामालाही लागायच्या. भलत्याच काटक असायच्या त्या. पण याचाच दुसरा अजुनी चालतोची वाट... ५६