पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीमाच नसायची. इतरांना छळण्यासाठी ती म्हणजे जणू एक खेळणेच असायची.” अधिक दुर्दैवाचा भाग म्हणजे महिलांच्या या दुरवस्थेला महिला स्वत:ही हातभार लावत. सुनांना छळणाच्या सासवा शेवटी महिलाच असत. मुलांना जेवायला वाढतानाही स्त्रियांकडून भेदभाव केला जाई; मुलांना जास्त आणि मुलींना कमी. बाई वडलांची लाडकी लेक; घरची श्रीमंत. तिला दुधदुभत्याला काही कमी पडू नये म्हणून तिच्यासाठी एक दुभती गायच तिच्या वडलांनी सासरी जाताना भेट दिली होती; पण तरीही त्या गाईचे दूध सासरी तिच्या वाट्याला येतच नसे. आजी लक्ष्मीआई छोट्या छोट्या गोष्टींतही मुलगा-मुलगी असा भेदभाव करायच्या. उदाहरणार्थ, जेवण वाढताना त्या रावसाहेबांना लोणी- दूध देत असत, पण त्यांच्या बहिणींना मात्र देत नसत. "हा माझा लाल आहे. तुम्ही काय मेल्यांनो, परक्याचं धन !" असे त्या मुलींना बोलूनही दाखवायच्या. बाह्य समाजातल्या प्रथाही महिलांवर अन्याय करणाऱ्या होत्या. उदाहरणार्थ, पुरुषांना पुनर्विवाह करायची मुभा होती पण बायकांना मात्र पुनर्विवाह करता येत नसे. स्त्रियांच्या नशिबी आलेल्या या गुलामीच्या विरुद्ध रावसाहेबांच्या भावना आजही खूप तीव्र आहेत, त्यावेळच्या आठवणी सांगताना आजही त्यांचा स्वर कातर होतो. याचा एक परिणाम म्हणजे जेव्हा त्यांनी स्वत:चा संसार थाटला तेव्हा आपल्या आईला त्यांनी खूप सन्मानाने व प्रेमाने वागवले आणि आजही त्यांच्या कुटुंबात सर्व स्त्रियांना सन्मानाने व प्रेमाने वागवले जाते. आलेल्या पाहुण्यांबरोबर घरातील महिलांची आवर्जून ओळख करून दिली जाते, गप्पांमध्ये वा चर्चेमध्ये त्यांचाही मोकळेपणे सहभाग असतो. रावसाहेबांच्या सूनबाई डॉ. प्रेरणा म्हणतात, व "पप्पांच्या व्यक्तिमत्त्वातील मला सर्वांत जास्त भावलेला पैलू म्हणजे पप्पांची स्त्रियांबद्दलची आदरभावना. घरात कोणीही पाहुणा आल्यावर पप्पा मला व मम्मीला चर्चेत सहभागी होता येईल असे पाहतात. स्त्रियांनी फक्त स्वयंपाकघरात राबणे, ही कल्पना आमच्या घरात मान्य नाही. समाजात मी असे कितीतरी तथाकथित मोठे लोक, पुढारी पाहते, जे मोठ्या सभेमधून स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रियांबद्दलची धोरणे याबद्दल नुसत्याच वल्गना करतात. घरी आल्यावर मात्र अशा लोकांची अपेक्षा असते, की घरातील स्त्रीने नेहमी त्यांच्या पुढेपुढे करावे, त्यांची मर्जी सांभाळावी. पण आमचे पप्पा मात्र जसे बोलतात, तसे घरातही वागतात. पप्पा आम्हांला सांगतात, 'घरात आणखी इतरांची मदत घ्या; परंतु आलेल्या पाहुण्यांबरोबर उठण्या-बसण्यासाठी पूर्ण मोकळा वेळ राखून ठेवा.' स्त्रीला घरात प्रपंच चालविताना कराव्या लागणाऱ्या कसरतीबद्दलची एवढी जाण, एवढी कळकळ आजकाल पाहण्यास मिळणे दुर्मिळ आहे. त्यात पप्पांसारख्यांच्या पिढीकडून या अपेक्षा नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ५५