पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुठल्याही यात्रेच्या ठिकाणी इतके बकरे कापले जात, की रक्तमांसाचा अगदी चिखल होऊन जाई. बाईंचे वडील (म्हणजे रावसाहेबांचे मातुल आजोबा) गणपतराव आंबरे यांनी सात लग्ने केली होती व त्यांच्या सहा बायका एका वेळी हयात होत्या. हे विवाहही पुत्रप्राप्तीसाठीच होते आणि 'मुलगा हवाच' हीही एक अंधश्रद्धाच होती. दुर्दैव म्हणजे घरात 'कुलदीपक' यायलाच हवा असे स्त्रियांना स्वत:लाही तीव्रतेने वाटे. महिलांची दुरवस्था हाही त्याकाळच्या समाजवास्तवाचा एक दुर्दैवी भाग होता. दळणकांडण, झाडलोट, सारवणे अशी त्यांची कितीतरी कामे पहाटे उठल्यापासूनच सुरू होत. मग स्वैपाक. मग डोक्यावर पाटीत भाकऱ्या घेऊन शेतावर जायचे. मग शेतावरचे काम. संध्याकाळी घरी येताना सरपणाची मोळी डोक्यावरून आणायची. मग पुन्हा स्वैपाक. अगोदर घरातल्या पुरुषांची पंगत. मग घरातील सासूबाईंसारख्या वडीलधाच्या कारभारणी. शेवटी मग सासुरवाशिणींनी जेवायचे. उरलेसुरले व शिळेपाके. सगळी आवराआवर करून रात्री सर्वांत उशिरा जेवायचे. आणि सकाळी पुन्हा सर्वांत लवकर उठायचे. रावसाहेब म्हणतात : "बाई व त्यांच्या जीजी- ताई या जावा गुपचूप भल्या पहाटे किंवा रात्री बेरात्री अंघोळी करत. केस विंचरणे, कुंकू लावणे इत्यादीही त्यांना लपूनछपूनच उरकून घ्यावे लागे. सर्वच स्त्रियांच्या नशिबी असे जिणे होते; चांगल्या घरच्या स्त्रियांनादेखील यापेक्षा वेगळी वागणूक नसायची. पितृपक्षात आपले दिवंगत पूर्वज जेवायला येतात असा एक गैरसमज रूढ होता. त्यांच्यासाठी म्हणून घरात मोठा रांजणभर कढी केली जाई. ती उरायची. ती पितराची शिळी कढी घरच्या स्त्रियांना कित्येक दिवस खावी लागायची. एका वर्षी तर ही कढी त्यांना तब्बल तीन आठवडे खावी लागली होती. मोठ्या माठात किंवा रांजणात ती ठेवलेली असायची. पार आंबून जायची. आमच्या घराण्याला आजोबांच्या काळापासून मान होता; पण तरीही माझी आई किंवा चुलत्या देवळासमोर तर राहोच, देवळासमोरच्या रस्त्यानेदेखील जाऊ शकत नव्हत्या. देवळात दर्शनालाही स्त्रियांनी जाण्याचा प्रघात नव्हता. क्वचित कधी कथा-कीर्तनाला काही स्त्रिया जात, पण त्याही इतरांपासून दूर बाजूलाच बसायच्या. पायात वहाणा फारच थोड्या स्त्रियांच्या नशिबी असायच्या; त्यात पुन्हा गावातला कोणी महत्त्वाचा पुरुष माणूस समोर दिसला तर लगेच बायका वहाणा काढून हातात घेत. डोक्यावर पदर सतत असायचा. घरातदेखील ओसरीवर किंवा पुरुषांची वर्दळ असायची अशा जागी स्त्रिया कधीच वावरत नसत. नव्याने लग्न होऊन आलेल्या सुनेच्या हालांना तर अजुनी चालतोची वाट... ५४