पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मानवी मनावर संस्कार करण्याची लिखित शब्दाची क्षमता अफाट आहे; टीव्ही आणि संगणक यायच्या आधीच्या त्या जमान्यात तर लिखित शब्द अधिकच प्रभावी होते. आपापल्या जगण्यातून, अनुभवांतून प्रत्येक जण शिकतच असतो; वाचन इतरही अनेकांच्या जीवनाचे, अनुभवांचे सार आपल्यापर्यंत आणून पोचवते. ते ज्ञान तर पुरवतेच पण जीवनातील गुंतागुंतही उलगडून दाखवते. म्हणूनच लहानपणी वाचलेले सिंदबाद आणि अल्लादिन, टारझन आणि रॉबिन हूड, श्रावण बाळ आणि श्याम उतारवयातही आपल्याला आठवत राहतात. सम्राट अशोकापासून नेपोलियनपर्यंत आणि चाणक्यापासून अब्राहम लिंकनपर्यंत अनेक महापुरुषांना आपण वाचनातूनच भेटतो आणि वाचनाच्या आनंदाबरोबरच त्यांचे संस्कारही आपल्या मनात झिरपत जातात. रावसाहेबांचे विचारविश्व घडवण्यातही नाशिकमध्ये सुरू झालेल्या वाचनाचा मोठा वाटा आहे. ते लिहितात, "वाचनाच्या दुनियेचा मी कायमचा प्रवासी बनलो, तो नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयापासून ' }} लहानपणी आपल्यावर जे संस्कार होतात त्यात आपले आईवडील, घरचे वातावरण, शेजारीपाजारी, परिसर, शाळा या सगळ्यांचा मोठा भाग असतोच; पण तत्कालीन सामाजिक परिस्थितीचाही त्या जडणघडणीत मोठा वाटा असतो. रावसाहेबांच्या आसपासची सामाजिक परिस्थिती त्यावेळी कशी होती ? अंधश्रद्धा हे तेव्हाचे एक जळजळीत वास्तव होते. म्हणजे आजही त्या आहेतच, पण त्यावेळी त्यांचा समाजमनावरचा पगडा अधिक होता. याची काही उदाहरणे सहज देता येतील. 'ठाणगाव-पाडळी! तिकडून आली हाडळी... हाव! हाव! हाव!' असे खेळताना पाडळीतली मुले गमतीने म्हणत. गावात भुताखेतांचे प्रस्थ खूप. तसेच चेटकांचे. गावात एखाद्या बाईला भुताळी तर एखादीला चेटकीण ठरवले जायचे. एखाद्यावर चेटूक केले या भ्रमातून तथाकथित चेटकिणीचा अनन्वित छळही केला जाई. नावजीबाबांसारख्या एखाद्या ठाकराला वनौषधींची खूप मोलाची माहिती होती; काही पानांचा रस जखमेवर लावायच्या आयोडिनसारखा वापरला जाई, अनेक रोगांवर ते हमखास इलाज करत. पण ही माहिती फक्त आपल्या वारसदारालाच सांगायची, आणि तीही फक्त आपण मरतेवळी; त्याआधी कोणाला सांगितली तर वनौषधींची ती 'ताकद' नाहीशी होते असा समज होता. मोलाचे असे बरेच वैद्यकीय ज्ञान त्यामुळे कालौघात नष्ट झाले. हाही अंधश्रद्धेचाच एक दुष्परिणाम. होळीच्या वेळी अग्निदेवाला आहुती द्यायची म्हणून मोठमोठी लाकडे जाळली जात; त्यासाठी उत्तम झाडेही तोडली जात. अशा परंपरा याही अंधश्रद्धेचाच एक भाग होता. देवीला बळी चढवणे हीही एक प्रचलित अंधश्रद्धा. नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ५३