पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शहरात बाजी मारली होती. आपल्याला चांगल्या लेखनाचेही अंग आहे याचा त्यांना झालेला हा पहिला साक्षात्कार. रावसाहेबांना वाचनाची गोडी लागली व त्या वाचनाला विशिष्ट अशी दिशा मिळाली ती नाशिकमधल्याच शालेय जीवनात. तत्पूर्वी पाठ्यपुस्तके आणि रामायण - महाभारतातल्या गोष्टींची किरकोळ पुस्तके सोडल्यास त्यांनी वाचन असे फारसे काहीच केले नव्हते. पाडळी - देवठाण - सिन्नर परिसरात चांगल्या पुस्तकांची उपलब्धताही नव्हती आणि वाचनाला पोषक असे वातावरणही नव्हते. नाशिकमध्ये आल्यावर मात्र त्यांना वाचनाचे वेडच लागले. त्यांच्या वाचनवेडाचे मोठे श्रेय वडीलबंधू अण्णासाहेब यांना द्यावे लागेल. अण्णासाहेब त्यावेळी बडोद्याला शिकत होते पण त्यांना नाशिकची चांगली माहिती होती. नाशिकचे सार्वजनिक वाचनालय त्यावेळीही प्रख्यात होते व त्याचे रावसाहेबांनी सदस्य व्हावे असे अण्णाभाऊंनी पत्रातून कळवले. त्यामुळे नाशिकमध्ये आल्याआल्याच रावसाहेब त्या वाचनालयाचे सदस्य झाले. आपल्या पत्रांतून अण्णाभाऊ वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती कळवत; रावसाहेब लगेच ती वाचनालयातून मिळवून आणत. हे वाचनालय सुसज्ज होते व आत बसून पुस्तके वाचायचीही सोय होती. किर्लोस्कर आणि स्त्री ही मासिके तसेच आचार्य अत्रे यांचे नवयुग आणि ना. सी. फडके यांचे झंकार ही साप्ताहिके तिथे येत. वाचकांची खूप झुंबड असे. देवगिरीकरांचे चित्रमयजगत आणि रामभाऊ तटणीस यांचे विविधवृत्त हीदेखील त्यावेळची लोकप्रिय नियतकालिके तिथे असत. त्याशिवाय वाचनालयात पुस्तकांचाही मोठा संग्रह होता. हरी नारायण आपटे, वामन मल्हार जोशी, वि. दा. सावरकर, वि. स. खांडेकर, रवीन्द्रनाथ टागोर हे रावसाहे आवडते लेखक बनले. पण त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम झाला तो सानेगुरुजींचा. त्यांची अनेक पुस्तके रावसाहेबांनी विकतच घेतली. फडकेही त्यावेळचे खूप लोकप्रिय लेखक पण रावसाहेबांना मात्र ते फारसे भावले नाहीत; प्रतिभासाधन हे त्यांचे एकच पुस्तक रावसाहेबांनी संपूर्ण वाचले. इथे कुसुमाग्रजांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. विशाखा हा त्यांचा कवितासंग्रह १९४२ साली प्रसिद्ध झाला पण त्यांच्या अनेक कविता त्यापूर्वीच प्रकाशित झाल्या होत्या व खूप गाजतही होत्या. 'क्रांतीचा जयजयकार' ही त्यांची कविता १९३९ सालीच प्रसिद्ध झाली होती व तिने त्यावेळच्या इतर असंख्य तरुणांप्रमाणेच रावसाहेबांनाही अक्षरशः वेड लावले होते. रस्त्याने जातायेताही ते ही कविता म्हणत. आजही आपल्या अनेक व्याख्यानांमधून ते या कवितेतल्या ओळी उद्धृत करत असतात. अजुनी चालतोची वाट... ५२