पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी साहित्य संघाचे संस्थापक अमृत नारायण भालेराव यांचे हे मावसभाऊ. साहित्यिक वर्तुळात त्यांची बरीच ऊठबस होती. ते उत्तम शिकवतही व स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी एक खास तासही घेत. रावसाहेबांवर त्यांची चांगलीच छाप पडली होती. दरवर्षी न्यू इंग्लिश स्कूलतर्फे एक हस्तलिखित प्रकाशित होई. त्याची जबाबदारी पुरोहितसरांवर असे. मुलांमधले लेखनगुण वाढीस लागावे या दृष्टीने होतकरू विद्यार्थी निवडून पुरोहितसर त्यांना वेगवेगळे विषय सुचवत व त्यांना पसंत पडले तर ते लेखन हस्तलिखितात प्रकाशितही करत. वार्षिक हस्तलिखित हा शाळेतर्फे होणारा एक महत्त्वाचा उपक्रम असे व त्याचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात होई. त्यात आपले काही प्रकाशित झाले तर विद्यार्थ्यांना खूप अभिमान वाटायचा. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून पुण्यातील आपल्या मुलांना लिहिलेले एक हृदयद्रावक पत्र प्रसिद्ध होते. त्या पत्रावर आधारित एक शब्दचित्र लिहावे असे पुरोहितसरांनी रावसाहेबांना सुचवले. टिळकांविषयी रावसाहेबांनी बरेच वाचन केलेले असल्याने त्यांनी लगेच ते लिहूनही दिले. बघताबघता एक ऑगस्टचा दिवस उजाडला. टिळक पुण्यतिथीचा यंदाचा कार्यक्रम सर्कल थिएटरमध्ये आयोजित केला होता. थिएटर भरगच्च भरले होते व प्रेक्षकांमध्ये रावसाहेबांचा समावेश होता. पुरोहितसर स्टेजवर होते व हस्तलिखिताविषयी श्रोत्यांना माहिती सांगत होते. बोलण्याच्या ओघात ते शब्दचित्राकडे वळले व त्यांनी ते आपल्या खड्या आवाजात वाचूनच दाखवायला सुरुवात केली. नाट्यशास्त्र व अभिनयकला यांचा पुरोहितसरांनी दांडगा व्यासंग केला होता व साहजिकच त्यांचे वाचन खूप प्रभावी होते. वाचनानंतर त्यांनी शब्दचित्राचे भरपूर कौतुक केले व ते म्हणाले, "ज्या विद्यार्थ्याने हे लिहिलं त्या ार्थ्याला तुम्ही पाहिलं तर इतक्या लहानशा विद्यार्थ्याने हे लिहिलं याच आश्चर्य वाटून त्यानेच हे लिहिलं यावर तुमचा विश्वासही बसणार नाही." पुढे व्यासपीठावरूनच "शिंदे आहे का रे इथे हजर ?" असे त्यांनी खड्या आवाजात विचारले. गांगरून रावसाहेब उभे राहिले. पुरोहितसरांनी त्यांना स्टेजवर बोलावले व त्यांची सर्व उपस्थितांना ओळख करून दिली. सर्वांना नमस्कार करून रावसाहेब खाली उतरले व टाळ्यांच्या कडकडाटात पुन्हा आपल्या जागी जाऊन बसले. हे कौतुक त्यांना अगदी अनपेक्षित होते. घरी लिहिलेली पत्रे सोडली तर त्यांचे हे पहिलेच लेखन. त्याचा एखाद्या जाहीर समारंभात इतका गौरव होईल हे त्यांच्या कल्पनेतही नव्हते. त्यांच्या मनावर ही आठवण कायमची कोरली गेली. एका छोट्या खेड्यातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने नाशिकसारख्या मोठ्या नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ५१