पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याची संगत जडली. आपला नेहमीचा पहिला बाक सोडून ते त्याच्याशेजारी शेवटच्या बाकावर बसू लागले; त्याच्यासारखेच चाळे करू लागले. पुढे तो त्यांना स्वत:च्या घरीही घेऊन जाऊ लागला. एका प्रचंड वाड्यात तो राहत असे. आत मोठा दिवाणखाना. त्यात गाद्या- लोडांची बैठक. शेजारी मोठा झोपाळा टांगलेला. त्याला वडील नव्हते. घरी म्हातारी आई एकटीच असायची. नोकरचाकर भरपूर. सगळा श्रीमंती थाट असायचा. त्याच्याबरोबर रावसाहेब गेले की तो वेगवेगळे पदार्थ करायला सांगायचा; रावसाहेबांची उत्तम सरबराई होई. हळूहळू त्यांचे त्याच्याकडचे जाणे वाढू लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणजे अभ्यासात ते अधिकाधिक मागे पडू लागले. त्यांची ही अधोगती इतर मुलांच्या व नव्या वर्गशिक्षकांच्याही लक्षात येत होती. एक दिवस शौचे गैरहजर होता. मधल्या सुट्टीत वर्गशिक्षकांनी रावसाहेबांना भेटायला बोलावले व चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, "शौचे हा उनाड मुलगा आहे. त्याला पास-नापासाचं काही सोयरसुतक नाही. तू चांगला विद्यार्थी असताना त्याच्या काय नादी लागतोस ?" त्यांच्या खडसावण्याचा चांगला परिणाम झाला. रावसाहेब एकदम भानावर आले. त्यांनी शौचेपासून स्वत:ला दूर ठेवायचे ठरवले. त्यातून एकदा त्याची संगत सुटली ती कायमचीच. पुन्हा कधी दोघांचा संबंध आला नाही. पुढल्या वर्षी, इंग्रजी चौथीच्या वर्गात, त्यांनी पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पूर्वीसारखे अगदी पहिल्या नंबरवर नाही गेले, पण दुसरा-तिसरा नंबर येऊ लागला. त्याच वर्षी त्यांनी हायस्कूल स्कॉलरशिपचीही परीक्षा दिली. मागच्या मिडलस्कूल स्कॉलरशिपप्रमाणे याही परीक्षेत उत्तम यश मिळवून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. मागील तीन वर्षांप्रमाणे आता पुढील तीन वर्षेही त्यांना सरकारतर्फे दरमहा पैसे मिळणार होते; आदल्या वेळी दरमहा पाच रुपये होती, यावेळी ती दरमहा सहा रुपये असणार होती. त्याकाळी पाच-सहा रुपयांनादेखील मोठेच मूल्य होते व त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या यशाला समाजात मान होता. घरी सर्वांनाच खूप आनंद झाला. दादांना तर विशेषच. कर्जबाजारी झाले असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी ते ज्या खस्ता खात होते त्यांचे जणू चीज होत होते. रक्कम इंग्रजी चौथीतली एक घटना नमूद करण्यासारखी आहे. मराठीचे त्यांचे शिक्षक वामन श्रीधर पुरोहित हे एक नामांकित लेखकही होते. त्याग, खुणेचे पान, मनोरथ, मराठी रंगभूमीच्या नाट्यमंदिरात वगैरे त्यांची पुस्तके प्रसिद्ध होती. मुंबई अजुनी चालतोची वाट... ५०