पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बिचारे गांगरून जायचे. गुपचूप काढता पाय घ्यायचे. वायफळ गप्पांचा किसनमामांना अगदी तिटकारा होता. पैशाच्या बाबतीतही किसनमामा खूप चिकट होते. पै-पावआणाही ते खूप जपायचे. घरासाठी कोणी किराणा- भाजीपाला घेऊन आले की लगेचच त्यांना दिलेल्या पैशाचा काटेकोर हिशेब द्यावा लागे. घरच्यांपैकी कोणाजवळ एक पैसाही जरी शिल्लक राहिला आणि तो परत देण्यात त्याच्या हातून थोडी जरी दिरंगाई झाली तरी किसनमामांना ते सहन होत नसे. समोरच्याला ते लगेच त्यावरून घालूनपाडून बोलत, अगदी आकाशपाताळ एक करत. आपले घर आणि काम सोडून किसनमामा कधीही कोणाकडे जात नसत. बघताबघता नाशिकमधले पहिले वर्ष संपले. इंग्रजी दुसरीची परीक्षा झाली. नेहमीप्रमाणेच पहिला नंबर मिळाला. शाळेतर्फे वर्षातून एकदा विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी व्हायची. रावसाहेबांचे दात व डोळे खराब आहेत असे त्यावेळी आढळले व प्रगतिपत्रात तसा शेरा पडला. पण उपचार काय करायचे व कसे करायचे याची त्यांना किंवा घरच्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे त्या शेयाकडे दुर्लक्षच केले गेले. तशी निसर्गतः रावसाहेबांची तब्येत चांगलीच होती; पण जेव्हा जंतुसंसर्गामुळे किंवा अन्य काही कारणांनी काही विकार व्हायचे तेव्हा प्रकृतीचे नैसर्गिक योगदान पुरेसे नसायचे; बाह्य वैद्यकीय उपचार करणे आवश्यक बनायचे. नेहमीच्या रोगांवर घरगुती, पारंपरिक औषधे मिळायची पण दात आणि डोळे यांना होणाऱ्या संसर्गावर (इनफेक्शनवर) पारंपरिक उपाय नव्हते; त्यासाठी आधुनिक वैद्यकीय उपचारांचीच गरज होती; पण त्यांच्याविषयी समाजात अज्ञान होते व त्यांची उपलब्धताही खूप कमी होती. त्यामुळे पुढे काळाच्या ओघात डोळ्यांचा दोष नाहीसा झाला तरी त्यांचे दात मात्र भविष्यातही त्रास देत राहिले. आरोग्यासंबंधीचे अज्ञान आणि उपचारांच्या सुविधांचा अभाव यांचे विपरीत दूरगामी परिणाम सर्वसामान्यांना कसे भोगावे लागतात याची जाणीव त्यावरून होते. पुढच्या, म्हणजे इंग्रजी तिसरीच्या वर्षी वर्गशिक्षक बदलले. त्या वर्षात रावसाहेबांचे अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झाले. त्याचे कारण म्हणजे वाईट संगत. शौचे नावाचा एक विद्यार्थी त्या वर्गात होता. तसा वयाने तो बराच मोठा होता पण अनेक वर्षे नापास होत गेल्यामुळे रावसाहेब गेले त्याच इयत्तेत तो राहिला होता. अभ्यासात त्याचे अजिबात लक्ष नसे. कशी कोण जाणे पण रावसाहेबांना नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ४९