पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामे करण्याचा हा पहिलाच अनुभव होता व त्यातून बरेच काही नवे शिकता आले. एक म्हणजे नाशिकचे गल्लीबोळही त्यांच्या परिचयाचे झाले. वणीची सप्तशृंगी देवी म्हणजे शिंदे घराण्याची कुलस्वामीनी. तिच्या यात्रेला जायच्या वेळी लहानपणी ते दोन-तीनदा नाशिकलाही आले होते. इथल्या विजयानंद टॉकिजमध्ये त्यांनी पूर्वी एकदा 'संत ज्ञानेश्वर' व नंतर एकदा 'संत तुकाराम' हे मराठी चित्रपट बघितले होते. सर्कल आणि विजयानंद हे दोनच सिनेमा हॉल त्यावेळी नाशकात होते. आयुष्यातले पहिलेच चित्रपट असल्याने ते रावसाहेबांच्या लक्षात होते, पण तेव्हा वय लहान असल्यामुळे आणि अनेक जण बरोबर असल्यामुळे एकूण शहराची मात्र त्यांची काही ओळख झाली नव्हती. यावेळी मात्र त्यांना नाशिकची चांगली माहिती झाली. नाशिकमध्ये वखारीच्या कामासाठी ते सगळीकडे सायकलनेच फिरत व त्यामुळे त्यांना सायकलही उत्तम चालवता येऊ लागली. गावाकडून आलेल्या मुलांना स्वाभाविकरीत्या असलेली शहरी वाहतुकीची भीतीही गेली. आत्मविश्वास वाढला. लाकडाची ने-आण करणे, हिशेब करणे, तो लिहिणे, बँकव्यवहार सांभाळणे, गि-हाइकांकडे लक्ष देणे या सगळ्यातून एक व्यावहारिक (प्रॅक्टिकल) चटपटीतपणा अंगी बाणला. आर्मीच्या डेपोमध्ये लाकडाचा पुरवठा तपासणारा व स्वीकारणारा बहुतेकदा एखादा इंग्रज अधिकारी असायचा. त्याच्याशी थोडेफार तरी इंग्रजीत बोलावे लागे. गोऱ्या माणसाशी प्रत्यक्ष काही व्यवहार करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग. त्यातूनही अनेक गोष्टी शिकता आल्या. या सगळ्यामुळेच "किसनमामांच्या वखारीच्या जगातल्या ह्या शिक्षणाने माझे जीवन अनुभवसंपन्न झाले, " असे रावसाहेब म्हणतात. किसनमामा बळकट शरीरयष्टीचे, उंचपुरे होते. धोतर, सदरा, कोट आणि डोक्यावर उंच काळी मखमली टोपी असा त्यांचा पोशाख असे. एखाद्या काँट्रॅक्टरला शोभणारा. चेहरा स भीर. सहसा कधी ते हसत नसत. स्वभावही खूप कडक आणि रागीट. घरीदारी सगळेच त्यांना टरकून असत. कोंडाआत्याचीही त्यांच्यापुढे काही बोलण्याची हिंमत नव्हती. त्यांचे लक्ष अहोरात्र धंद्यावरच असे. दुसऱ्या कशातच त्यांना काही रुची नव्हती. बोलणे नेहमी गुर्मीत. कामासाठी येणारी माणसे सोडली तर त्यांच्याकडे कधीच कोणी पाहुणेरावणे येत नसत. कोंडाआत्यांचे भाऊ क्वचित कधी येत. पण ते आले रे आले की किसनमामा त्यांच्यावर डाफरत. "काय रे? काय काम काढले? कशाला आलात?" असे रागाने विचारत. "सहज भेटायला आलो होतो," असे ते म्हणाले की किसनमामांचा पारा आणखी चढायचा. "कामधंदा सोडून आले इकडे फुकटचे खायला ! जा घरी, कामधंद्याला लागा! इथे लोळत थांबू नका!" असे ते चढ्या आवाजात खडसावत. मेहुणे अजुनी चालतोची वाट... ४८