पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेऊन गावात जात. दोन-तीन ठिकाणी दुधाचा रतीब घालायचा असे. घरी आले की अंघोळ. अंघोळीनंतर कपभर दूध. ते झाले की म्हशींना नदीवर पाणी पाजून आणायचे; मग परत गोठ्यात बांधून चारा घालायचा. त्यानंतर परत थोडा वेळ अभ्यास. आणि मग शाळा. भरभर चालले तर पायी शाळेत जायला साधारण वीसएक मिनिटे लागायची. बरोबर अकरा वाजता शाळा सुरू व्हायची आणि पाच वाजता संपायची. शाळेतून घरी आले की लगेच म्हशी सोडून नदीवर न्यायच्या. तिथे पाणी प्यायल्यावर नदीत डुंबायला म्हशींना खूप आवडायचे. त्याचवेळी त्यांना घासून चोळून धुता येई. त्याचवेळी रावसाहेबांचीही नदीत अंघोळ व्हायची. मग म्हशींना परत गोठ्यात आणून बांधायचे व चारा घालायचा. त्यानंतर मग वखारीच्या कामात किसनमामांना मदत करावी लागे ती थेट रात्रीच्या जेवणापर्यंत. जेवणानंतर ते पुन्हा अभ्यासाला बसत. असा भरगच्च दिवस असायचा. वखारीचे काम रावसाहेबांच्या दृष्टीने खूप नवे होते व लौकरच त्यांना ते आवडूही लागले. संध्याकाळी गवत, सरपण व कोळसा यांसाठी बरीच गिऱ्हाइके यायची. त्यांना हवा तो माल मोजून द्यायचा व मग त्याचा लेखी हिशेष व जमलेले पैसे किसनमामाकडे द्यायचे. सागवानी लाकूडविक्रीच्या कामातही लौकरच रावसाहेब तरबेज बनले. वखारीच्या कामासाठी बाहेरही जावे लागे. सरकारच्या जंगल खात्याचे ऑफिस नाशिक शहराच्या बाहेरच्या भागात त्र्यंबक रोडवर होते. त्या खात्यात नेहमीच कामे असायची. कधीकधी बँकेत, पोस्टात जावे लागे. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता व लष्कराकडून सागवानी लाकडाला प्रचंड मागणी असे. पूल बांधणे, इमारती उभारणे, फर्निचर बनवणे अशा असंख्य कामांसाठी सागवानी लाकूड उत्तम समजले जाई. ही गरज फक्त भारतीय लष्कराची नव्हती तर जगभर लढणाच्या ब्रिटिश फौजांची होती. त्यांना उच्च दर्ज्याचे लाकूड लागे व त्याचे पैसेही चांगले मिळत. जगभर पुरवल्या जाणा-या या मालाबद्दल लष्कराच्या अटीही खूप होत्या व त्यांचे काटेकोर पालनही केले जाई. लष्कराने ऑर्डरमध्ये नोंदवलेल्या मापाप्रमाणे लाकूड कापणे, कापलेल्या लाकडांचे आकारानुसार ढीग बांधणे, ढिगाच्या सर्वांत वरच्या फळीवर मालाबद्दलच्या माहितीची विशिष्ट रंगाने इंग्रजीत नोंद करणे, योग्य ती कागदपत्रे तयार करणे व सर्व तयार माल नासरडी पुलाजवळ नाशिकरोड रस्त्याला असलेल्या मिलिटरीच्या डेपोत पोहोचवणे असे या पुरवठाकामाचे स्वरूप होते. हा व्यवसाय वाढू लागला तशी किसनमामांनी लाकडाचा पुरवठा करण्यासाठी नाशिकरोड रस्त्यालाही एक डेपो काढला. तिथेही रावसाहेबांना रोज जावे लागे. शेतीकाम रावसाहेबांनी लहानपणापासूनच केले होते पण अशाप्रकारची व्यापारी नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ४७