पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाशिकच्या मोठ्या अवकाशात जून १९४० मध्ये रावसाहेबांनी नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी दुसरीच्या वर्गात प्रवेश घेतला. सिन्नरची शाळा जी संस्था चालवायची तीच संस्था त्याच नावाची नाशिकमधील ही शाळाही चालवायची. पण पाडळी-देवठाण - सिन्नरपेक्षा नाशिक जसे अनेक पट मोठे होते तसेच सिन्नरच्या शाळेपेक्षा संस्थेची ही शाळाही अनेक पट मोठी होती. शाळा सर्कल सिनेमाच्या जवळपास होती. एक भला मोठा चौक व त्याच्या चारी बाजूंनी शाळेच्या इमारती. आता या शाळेचे नाव रंगठा हायस्कूल आहे. नाशिकमधली ही सर्वांत मोठी शाळा होती. रावसाहेब सिन्नर सोडणार म्हटल्यावर तिथले हेडमास्तर कोरडे काहीसे नाराजच झाले होते; इतका हुशार विद्यार्थी दुसरीकडे जाणे साहजिकच त्यांना आवडणारे नव्हते. पण रावसाहेबांच्या सिन्नरमध्ये वास्तव्य करण्यातल्या गैरसोयी त्यांना जाणवत होत्या आणि इतक्या हुशार मुलाला सिन्नरसारख्या छोट्या गावी स्वयंविकासासाठी फारसा वाव राहणार नाही हेही त्यांना जाणवले. शेवटी शाळा सोडल्याचा दाखला देताना नाशिकमधील प्रिन्सिपॉल जे. पी. ताडे यांच्या नावाने त्यांनी एक पत्र दिले व रावसाहेबांना सिन्नरहून निरोप दिला. त्या पत्राचा चांगलाच परिणाम झाला. प्रथमदर्शनीच प्रिन्सिपॉल ताडे यांचे रावसाहेबांविषयी अनुकूल मत बनले. "अरे वा! कोरडेसरांनी तर तुझे फारच कौतुक केले आहे,” असे म्हणत प्रसन्न मुद्रेने त्यांनी प्रवेश अर्ज भरून घेतला व रावसाहेबांना फ्रीशिपही दिली. लगेचच आपल्या वर्गात रावसाहेब दाखल झाले. वर्गात एकूण चाळीस मुले होती. अशा मोठ्या शाळेत रुळणे रावसाहेबांना सुलभ झाले याचे दुसरे एक कारण म्हणजे त्यांना लाभलेले उत्तम वर्गशिक्षक ताडे. हे ताडेमास्तर म्हणजे प्रिन्सिपॉल ताडेंचेच धाकटे बंधू होते. ते इंग्रजी शिकवत. अतिशय मन लावून शिकवत व नाशिकच्या मोठ्या अवकाशात... ४५