पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नातेवाइकांकडेच राहण्याची सोयही होण्यासारखी होती. हे सगळे विचारात घेऊन पुढील शिक्षणासाठी मुलाला नाशिकला पाठवायचे त्यांनी ठरवले. रावसाहेबांचीही आता मोठी झेप घ्यायची मानसिक तयारी झाली होती; तेवढा आत्मविश्वास अंगी बाणला होता. आतापर्यंतचे त्यांचे सारे शिक्षण पाडळी, देवठाण आणि सिन्नर या तुलनेने छोट्या असलेल्या गावांमध्येच झाले होते. ही तिन्ही गावे पंचक्रोशीतच होती, आसपासचे वातावरण ओळखीचे होते. नाशिकची गोष्ट मात्र वेगळी होती. पाडळीपासून ते तीस-पस्तीस मैल (पन्नास-साठ किलोमीटर) लांब होते; त्या काळचे दळणवळण विचारात घेता हे अंतर तसे बरेच होते. नाशिकला त्यापूर्वी रावसाहेब फक्त एक-दोनदाच गेले होते; नाशिकची त्यांना फारशी काही माहिती नव्हती. पण आपण शिकायला नाशिकला जावे हे वडलांप्रमाणे त्यांनाही पटले. त्यांच्या वयालाही आता बारा वर्षे पूर्ण झाली होती, एका अर्थाने बालकाण्ड संपले होते; इंग्रजीत ज्याला टीन एज म्हणतात त्या धाडसाच्या वर्षांची सुरुवात होत होती. पंचक्रोशीतल्या पाउलखुणा मनात घर करून होत्याच, पण नाशिकच्या क्षितिजाची ओढही खूप तीव्र होती. ■ अजुनी चालतोची वाट... ४४