पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुद्ध वाणीचाही मोठा वाटा होता. आयुष्यात मानहानीचे प्रसंग केव्हा ना केव्हा प्रत्येकाच्याच वाट्याला येतात, अपमानाचे दुःख केव्हा ना केव्हा झेलावेच लागते. अशा वेळी ते शल्य मनात कुरवाळत ठेवण्याऐवजी व अपमानकर्त्याचा द्वेष करत बसण्याऐवजी त्या प्रसंगापासून योग्य ती प्रेरणा घेणे व जिद्दीने स्वतःचा विकास करून घेणे किती महत्त्वाचे असते हेच या उदाहरणावरून रावसाहेब शिकले. रावसाहेबांच्या इंग्रजीतील यशाचा दादांनाही खूप आनंद झाला. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांच्या जलशांतही दादांचा सहभाग असे. नाशिकचे प्रा. अशोक सोनवणे यांना कागदोपत्री सापडलेल्या नोंदींनुसार ९ एप्रिल १९१९ रोजी पाडळी गावात सत्यशोधक समाजाची एक परिषदही भरली होती व तिला तब्बल पाचशे जण हजर होते. गावचे पाटील व सत्यशोधक या नात्याने त्यात स्वाभाविकच दादांचा पुढाकार असणार. त्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रावबहादूर रामचंद्रराव वंडेकर होते. या रामचंद्ररावांच्या वडलांनीच जोतिबा फुले यांना 'महात्मा' ही उपाधी सर्वप्रथम मुंबईतील एका कार्यक्रमाच्या वेळी दिली होती. या चळवळीने खेड्यापाड्यांतूनसुद्धा जागृतीचे वारे वाहू लागले होते. लग्नसमारंभ मुहूर्त वगैरे न पाहता आणि विधी सांभाळणा-या ब्राह्मणांशिवाय पार पडू लागले होते. शिक्षण ही कुठल्याही विशिष्ट जातीची मक्तेदारी नसून समाजाच्या सर्वच स्तरांत आणि अगदी तळागाळातही ते रुजले पाहिजे हे लोकांना पटू लागले होते. स्वतः जोतिबांना शिक्षण ही विकासाची गुरुकिल्ली वाटे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या आपल्या १८८३ साली प्रसिद्ध झालेल्या 'शेतकऱ्यांचा असूड' या पुस्तकाच्या उपोद्घाताच्या प्रारंभी त्यांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध शब्दांमध्ये जोतिबांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते. दादांनाही ते पटले होते व म्हणूनच स्वतः कर्जबाजारी झाले असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नव्हता. सिन्नरची शाळा आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अपुरी ठरेल हे त्यांनी हेरले. नाशिकला परगावच्या शाळेत ४३