पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्थातच भाबडेपणा ठरेल; पण त्यांच्या अस्तित्वामुळे आपली मानवी मूल्यांवरची श्रद्धा दृढमूल होते, आदर्श जीवनाकडे वाटचाल करण्याची उमेद बळावते. रावसाहेबांचे जीवन आणखी एका कारणाने मला महत्त्वाचे वाटते. ते कारण म्हणजे परंपरेकडून नवतेकडे होत असलेल्या आपल्या समाजातील स्थित्यंतराचा रावसाहेब हा एक चालताबोलता, हिंडताफिरता दस्तावेज आहे. महादेव मळ्यातल्या पिंपळाच्या पारावर एखाद्या निवांत संध्याकाळी जरा बसले आणि या कुटुंबाचा विचार करू लागले, की एका मोठ्या स्थित्यंतराच्या खुणा पटापट समोर येतात. या पाराला लागूनच महादेवाचे मंदिर आहे आणि शेजारीच अत्याधुनिक उपचारांनी वंध्यत्वावर मात करणारे शिंदे हॉस्पिटलही आहे. गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ इथे विसावतात आणि श्रीरामपुरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क कसे उभारता येईल याची गंभीर चर्चाही इथे चालू असते. बुरसटलेल्या धार्मिक कर्मकांडांपासून हे घर दूर आहे आणि उथळ ड्रिंक- पाटर्यांपासूनही तितकेच दूर आहे. आई-वडलांना मम्मी-पप्पा म्हणत असतानाच वाकून नमस्कार करायची परंपराही इथे जपली गेली आहे. इथली मंडळी म्हशीचे दूधही काढतात आणि इंटरनेटवर चॅटिंगही करतात; कोंबड्याही पाळतात आणि मोबाइलवरून ट्वीटही करतात; इथल्या आवारात घोडेही बांधलेले आहेत आणि अत्याधुनिक मोटारीही लावलेल्या आहेत. आपल्याला आवडो वा न आवडो, भारताचा आणि एकूणच जगाचा, प्रवास हा खेड्यांपासून शहरांकडे या दिशेने चालू आहे. 'खेड्यामधले घर कौलारू' असे आपण कितीही स्मरणगुंजन केले, तरी उद्याच्या जगात खेडी अधिकाधिक स पडत जाणार आहेत आणि शहरे अधिकाधिक मोठी होत जाणार आहेत. हे केवळ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर केलेले स्थलांतर नाही, हे उत्क्रांतीच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होणारे संक्रमण आहे. आपल्या समाजाचा एक फार मोठा हिस्सा आज या संक्रमणावस्थेतून जात आहे. एका व्यापक संदर्भाच्या चौकटीत बघितले, तर शिंदे कुटुंबाचा प्रवास हे या संक्रमणाचे एक प्रातिनिधिक चित्र आहे. पाऊणशे वर्षांपूर्वीचे पाडळी गाव मी अर्थातच कधी बघितले नव्हते, पण त्या गावचे तत्कालीन चित्र मी माझ्या मन:पटलावर थोडेफार रेखाटू शकतो. तिथल्या ओबडधोबड माळरानावरून म्हशीमागे धावणारे खेडवळ रावसाहेब मला दिसतात. नंतरच्या एका चित्रात बेचाळीसच्या आंदोलनात देवीच्या खिंडीतला पूल उडवून दिल्यावर जीव मुठीत घेऊन पळताना ते दिसतात. मग भूमिगत असताना मुसळधार पावसात चिंब भिजलेले, रात्रीच्या मिट्ट काळोखात घरी आसन्याला आलेले अजुनी चालतोची वाट... ४३९