पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेमुर्वतखोरेपणा वाढीस लागतो. एकदा या गर्तेत माणसे रुतत गेली, की त्यातून बाहेर पडणे अशक्यप्राय होऊन बसते. संगमनेरची भावी वाटचाल आता विवेक, शहाणपण आणि खरेखुरे ज्ञान यांच्या आधारावर व्हायला हवी. लक्ष्मी आणि सरस्वती इथे एकत्र नांदायला हव्यात. इथल्या घराघरात चारित्र्यशीलता कशी विकसित होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. " सर्व चार पाच हजार श्रोते रावसाहेबांचे परखड शब्द मनापासून ग्रहण करत होते; संमतिदर्शक मान हलवत होते. कार्यक्रम संपल्यानंतरही ज्या आदराने व मोठ्या संख्येने लोक रावसाहेबांच्या पाया पडत होते, तेही अचंबित करणारे होते. रावसाहेब कधीच आमदार वा मंत्री नव्हते, पद्म पुरस्काराने सन्मानितही नव्हते. कुठल्या बड्या परदेशी विद्यापीठात त्यांचे शिक्षण झालेले नाही. रयत शिक्षण संस्थेचे ते चेअरमन असले तरी हे पद कुठल्याही आर्थिक लाभाशी, सोयी- सवलतींशी, बंगला-गाडी- स्टाफशी जोडलेले नाही. लौकिकार्थाने बघितले तर रावसाहेब सामान्यांमधलेच एक आहेत. असे असतानाही एवढ्या सगळ्या लोकांना रावसाहेबांविषयी हा आदर का वाटत होता? मला वाटते, याचे कारण म्हणजे समाजाला ज्या एका नैतिक शक्तीची आत कुठेतरी भूक असते त्या नैतिक शक्तीचे रावसाहेब प्रतिनिधित्व करतात. ज्या पायांवर डोके टेकवावे असे पाय हीदेखील समाजाची एक गरज असते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ विचारवंत व लेखक अशा विविध रूपांनी रावसाहेब शिंदे समाजात परिचित आहेत. पण ज्यांना त्यांचा अजिबात परिचय नाही, अशांच्या मनातही त्यांना प्रथम पाहताक्षणी एक सोज्वळ प्रतिमा उभी राहते. त्यांचा पांढरा शुभ्र खादीचा लेंगा- झब्बा, पूर्ण टक्कल, चेहऱ्यावरील निर्मळ निरागस हास्य, देहबोलीतील विनम्रता, शाऐंशी पावसाळे पाहिलेल्या डोळ्यांतील अगत्य आणि एक प्रकारचा नैतिक ध्यास यांचे मिश्रण पाहिल्यावर हा एक सज्जन, प्रामाणिक माणूस आहे याची प्रथमदर्शनीच खात्री पटते. आचार्य जावडेकर यांनी यतिवर्गाची एक संकल्पना मांडली होती. जी माणसे सत्तेत सहभागी न होताही आपल्या उच्च नैतिक आचरणाच्या बळावर सत्तेवर अंकुश ठेवू शकतात, अशांचा समावेश त्यांनी या यतिवर्गात केला होता. या व्यक्तींचे आयुष्य म्हणजे समाजापुढे एक आदर्श असतो. या संकल्पित यतिवर्गातच कदाचित आपल्याला रावसाहेबांची गणना करता येईल. अशा व्यक्ती आजही आपल्या समाजात कार्यरत आहेत, ही जाणीव भविष्याविषयीचा आशावाद पालवणारी आहे. अशा व्यक्तींमुळे सगळा समाज बदलू शकतो असे म्हणणे हा अजुनी चालतोची वाट... ४३८